सोलापूर : ‘बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र’, ‘सिद्धेश्वर महाराज की जय’च्या नामघोषात व भक्तिरसाने ओथंंबलेल्या वातावरणात निघालेल्या नंदीध्वजांच्या डौलदार मिरवणुकीने रविवारी (दि. 12) श्री सिद्धेश्वर महाराजांनी स्थापित केलेल्या 68 शिवलिंगांना तैलाभिषेक करण्यात आला. या तैलाभिषेकाने सोन्नलगीच्या भूकैलासातील सिद्धेश्वरांच्या पाच दिवसांच्या पावन यात्रेस सुरुवात झाली.
रविवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास उत्तर कसब्यातील हिरेहब्बू वाड्यात मानकरी राजशेखर हिरेहब्बू, सागर हिरेहब्बू, राजशेखर देशमुख, सुदेश देशमुख, आ. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या व दुसर्या नंदीध्वजांची पूजा केली. यावेळी काशी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी, आ. देशमुख, खा. प्रणिती शिंदे, माजी आ. विश्वनाथ चाकोते उपस्थित होते. तत्पूर्वी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हिरेहब्बू वाड्यात मानाच्या पहिल्या व दुसर्या नंदीध्वजास साज चढविण्यात आला.
सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हिरेहब्बू वाड्यातून नंदीध्वजांच्या मिरवणुकीस सुरुवात झाली. सागर हिरेहब्बू यांच्या हातात सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंड होता. ‘श्रीं’ची व नंदीध्वजांचे दर्शन घेण्यासाठी मिरवणूक मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी गर्दी केली होती. नंदीध्वज एक-एक गल्ली पार करीत सिद्धेश्वर मंदिराकडे मार्गस्थ होत असताना भाविकांनी तैलाभिषेकासाठी तेल अर्पण केले. पंचकट्टा येथे सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीने ‘श्रीं’ची पूजा करण्यात आली. नंदीध्वज जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील जुन्या फाटकाजवळ आले.
या यात्रेत झेंडा ग्रुप अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत होता. ज्या ठिकाणी नंदीध्वज थांबविले जातात, त्यावेळी सर्वांनी थांबावे, असा इशारा या ग्रुपमार्फत लाल झेंडा फडकावून देण्यात येतो. त्यानुसार सिद्धेश्वर भक्त आणि नंदीध्वज मार्गक्रमण करीत होते. सिद्धरामेश्वरांचा अखंड जयघोष यावेळी सुरू होता. तेथे ब्रिटिश काळापासून चालत आलेल्या परंपरेनुसार हिरेहब्बूंना देशमुख कुटुंबियांच्यावतीने सरकारी आहेर केला. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास नंदीध्वज आल्यानंतर सिद्धेश्वर मंदिर परिसरातील 68 लिंगातील पहिल्या अमृतलिंगाजवळ आल्यानंतर तैलाभिषेक करुन मानकर्यांना विडा देण्यात आला. शिवयोगी योगसमाधी व गर्भ मंदिरातील श्रींच्या गदगीस तैलाभिषेक घालून हिरेहब्बू यांनी विधिवत पूजा केली. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उर्वरित लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी नंदिध्वजांची मिरवणूक सिद्धेश्वर मंदिरातून मार्गस्थ झाली. मिरवणुकीने रात्री उशीरा नंदीध्वज मल्लिकार्जुन मंदिरात दाखल झाले.
आज अक्षता सोहळा
श्री सिद्धेेश्वर महाराजांनी बाराव्या शतकात आपल्या योगदंडाचा कुंभारकन्याशी विवाह लावून दिला होता. त्याचेच प्रतीक म्हणून दरवर्षी मकर संक्रांतीच्या भोगी दिवशी सिद्धरामेश्वरांचा विवाह सोहळा पार पडतो. सोमवारी (दि. 13) दुपारी एक वाजता संमती कट्याजवळ नंदीध्वजांच्या साक्षीने अक्षता सोहळा होणार आहे.

