

सोलापूर : राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने श्री सिद्धेश्वर साखर कारखान्यास 199.94 कोटीचे कर्ज देण्यास नकार दिला. यामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या या कारखान्यापुढील अडचणी आता आणखी वाढणार आहेत.
राज्यातील सलग तीन वर्षे बंद असलेल्या आणि आर्थिक अडचणीतील 14 सहकारी कारखान्यांना कर्ज देण्याविषयी राज्य सरकारने राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडे (एनसीडीसी) शिफारस केली होती. त्यापैकी सात कारखान्यांना तूर्तास कर्ज मिळणार नसल्याचे एनसीडीसीने स्पष्ट केले. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील श्री सिद्धेश्वर कारखान्याचा समावेश आहे. या कारखान्याने 199.94 कोटी रुपये कर्जाची मागणी केली होती.
श्री सिद्धेश्वर कारखान्याला राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळांकडून कर्ज मिळावे यासाठी ज्येष्ठ संचालक धर्मराज काडादी यांनी भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. भाजपच्या नेत्यांशी जुळवून घेऊन त्या दिशेने वाटचाल त्यांची सुरू होती. मात्र, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने कारखान्याला कर्ज नाकारल्याने आता काडादी कोणती भूमिका घेणार याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.