

सोलापूर : पांढऱ्या शुभ्र बारबंदी वेशातील भाविक आणि शेजारी निळ्याशार पाण्याने भरलेला तलाव, शेजारी ऐतिहासिक साक्ष देणारा भुईकोट किल्ला आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये मंगलमय वातावरणात फुलांनी सजलेल्या संमती कट्ट्यावर सिद्धरामेश्वरांचे योगदंड आणि कुंभार कन्येचा अक्षता सोहळा मंगळवारी दुपारी 1 वाजून 33 मिनिटांनी पार पडला.
मानाचे सातही नंदीध्वज योगदंड यांच्या साक्षीने मानकरी सुहास शेटे यांनी संमती वाचनात सत्यम, सत्यम दिडम, दिडम म्हणताच लाखो भाविकांनी दहा दिशांनी अक्षतांचा वर्षाव करत मनोभावे दर्शन घेतले. अक्षता सोहळ्यासाठी भुईकोट किल्ला, सिद्धरामेश्वर मंदिर, कैलास दरवाजा, सिध्देश्वर प्रशाला, डॉ. फडकुले सभागृह, पार्क चौक, नुमवी शाळेपर्यंत भाविकांची गर्दी लोटली होती. अक्षता सोहळ्यानिमित्त सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्ट्याजवळ सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. दुपारी पावणेएक वाजण्याच्या सुमारास श्रींची पालखी, योगदंड, नंदीध्वज व मानकरी हिरेहब्बू, देशमुख, शेटे यांचे आगमन झाल्यानंतर अक्षता सोहळ्यातील विधींना प्रारंभ झाला. अक्षता सोहळ्याला कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्रातील लाखो भाविकांची उपस्थिती होती. हा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला.
मल्लिकार्जुन मंदिरजवळील हिरेहब्बू वाड्यातून सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास निघालेली नंदीध्वजांची मिरवणूक संमती कट्ट्याजवळ आल्यावर कुंभार समाजाच्या मानकऱ्यांना मानकरी हिरेहब्बू व देशमुख यांच्याकडून मानाचा विडा देण्यात आला. योगदंड, नंदीध्वज साक्षीने पूजा झाली. संमती कट्टा येथे सुहास शेटे यांनी सम्मतीवाचन केले. अक्षता सोहळ्यानंतर 68 शिवलिंगातील पहिले अमृतलिंगाचे पूजन झाले. अक्षता सोहळा पार पडल्यानंतर सिद्धरामेश्वरांच्या गदगीची पूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिरात काहीकाळ विश्रांती घेऊन 68 लिंगांना पंचामृतभिषेक करण्यासाठी नंदीध्वज मार्गस्थ झाले.
या अक्षता सोहळ्यासाठी काशी पीठाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी, माजी खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, उज्ज्वला शिंदे, पालकमंत्री जयकुमार गोरे, खा. प्रणिती शिंदे, आ. विजयकुमार देशमुख, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस अधिकक्षक अतुल कुलकर्णी, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, माजी आ. दिलीप माने, पुष्कराज काडादी, राजशेखर शिवदारे आदी उपस्थित होते.