

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थांच्या पवित्र नगरीच्या विकास प्रक्रियेला अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येत प्रत्यक्ष गती मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन पहिल्या टप्प्यातील ५०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची तयारी करून तो शासनाकडे तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या बैठकीला गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त सचिव असिमकुमार गुप्ता आणि म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी आणि लोकेश चंद्रा, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना तसेच म्हाडाचे इतर अधिकारी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस उपस्थित होते.
आमदार कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोटचा विकास आराखडा विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून म्हाडाकडे सोपविण्याची मागणी केली होती. त्यानुसार अक्कलकोट नगरपरिषद, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि म्हाडा यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. बैठकीत श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर, श्री स्वामी समर्थ समाधी मठ परिसर आणि भाविकांसाठी आवश्यक आधुनिक सुविधा उभारण्याचा सविस्तर आराखडा तयार करून पहिल्या टप्प्यातील ५०० कोटी रुपयांच्या विकासकामांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
दुसऱ्या टप्प्यात श्री स्वामी समर्थ मंदिर ते श्री स्वामी समर्थ समाधी मठ या पालखी मार्गाचे सुशोभीकरण, विस्तारीकरण आणि भाविकांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होईल. अक्कलकोटमध्ये वाहतूक व्यवस्था, पार्किंग, स्वच्छता, पायाभूत सुविधेवर विशेष भर देण्यात येणार आहे.
ऐतिहासिक निर्णयानिमित्त नगरपरिषदेच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने सत्कार झाला. यावेळी उपनगराध्यक्ष ऋतुराज राठोड, पक्षनेते यशवंत घोंगडे, बांधकाम सभापती सद्दाम शेरीकर, पाणीपुरवठा सभापती देविदास कवटगी, नगरसेवक महेश इंगळे, महेश हिंडोळे, लक्ष्मीकांत धनशेट्टी, भीमराव शेळके, प्रवीण शहा, अशोक जाधव, नावेद डांगे, संजय घोडके, तसेच सुनील सिध्दे, नागराज कुंभार, सचिन शिंदे, शिवराज स्वामी, बबलु कामनूरकर, रूद्रय्या स्वामी, महेश लिंबोळे, अब्दुल गवंडी, मुब्बा शेख आदी मान्यवर उपस्थित होते.