Ashadhi Wari: संत गजानन महाराज पालखीचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत

श्री संत गजानन महाराजांच्या ५७ व्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी सायंकाळी सोलापूर जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात आगमन झाले
Ashadhi Wari: संत गजानन महाराज पालखीचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत
Published on
Updated on
संतोष पवार

कासेगाव : 'विठ्ठल माझा माझा...', 'श्री सद्‌गुरू गजानन महाराज की जय...', 'गण गण गणात बोते...' या अखंड नामघोषात, टाळ-मृदंगाच्या निनादात, विणेच्या मंजुळ स्वरात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने श्री संत गजानन महाराजांच्या ५७ व्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी सायंकाळी सोलापूर जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात आगमन झाले.

धाराशिव-सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील तामलवाडीजवळील लक्ष्मीनारायण स्पिनर्स मिलसमोर पालखीने जिल्ह्यात प्रवेश करताच हरिनामाचा गजर, पुष्पवृष्टी आणि जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. या पालखीचा आजचा दुसरा मुक्काम सोलापुरातील कुचन प्रशाला येथे होणार आहे.

७०० वारकऱ्यांचा शिस्तबद्ध ताफा, समोर भगव्या पताकाधारी वारकरी, मागे टाळ-मृदंगाच्या गजरात दिंड्या, अश्व आणि हत्तीच्या प्रतिकृतीने सजलेली संत गजानन महाराजांची पालखी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. पालखीच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, शासकीय यंत्रणांनी उत्कृष्ट नियोजन केले आहे.

सीमेवरील स्वागतानंतर पालखी दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथे मुक्कामस्थळी दाखल झाली. ग्रामस्थांनी फुलांच्या पायघड्या, आकर्षक रांगोळ्या आणि हरिनामाच्या गजरात पालखीचे जल्लोषात स्वागत केले. वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी वॉटरप्रूफ मंडप, पाणी, महाप्रसाद, स्वच्छतागृहे, आरोग्यसेवा, रुग्णवाहिका आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news