

अक्कलकोट : पुढारी वृत्तसेवा
अक्कलकोट निवासी दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळ स्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आज (शनिवार) श्री दत्त जयंती उत्सव अपार श्रद्धेने व मोठ्या भक्ती भावात साजरा झाला. या निमित्ताने लाखों भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले.
पहाटे पाच वाजता मंगलमय वातावरणात देवस्थानचे पुरोहित मोहन महाराज पुजारी यांच्या अधिपत्याखाली व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या उपस्थितीत श्रींची काकड आरती झाली. त्यानंतर स्वामी भक्तांना दर्शनाकरिता मंदिर खुले करण्यात आले. सकाळी साडेअकरा वाजता नैवेद्य आरती भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. दत्त जयंती निमित्त राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या पालख्या दिंडी पदयात्रा अक्कलकोट निवासी विसावल्या. यामध्ये रत्नागिरी, भांडुप, मुंबई, सातारा, बार्शी, सोलापूर, कोल्हापूरसह राज्यातील विविध जिल्ह्यातून पालखी आल्या होत्या.
गेल्या दोन दिवसांपासूनच पोलीस प्रशासनाने मंदिर परिसरात पार्किंगची व्यवस्था वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून देवस्थान परिसरातील मोकळ्या जागेत लाकडी बॅरीगेट्सद्वारे दर्शन बारी करण्यात आली होती. वाहनांकरिता मैंदर्गी रोडवरील भक्तनिवास समोरील वटवृक्ष देवस्थानचे रुग्णालय परिसर, बसलेगाव रोडवरील सेकंद दर्गा परिसर, ए वन चौकातील मंगल कार्यालय परिसर, हत्ती तलाव परिसरात वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली होती.
दत्त जयंती निमित्त अक्कलकोट शहरातील गुरु मंदिर, राजेराय मठ, समाधी मठ, शिवपुरी, खंडोबा मंदिर, हक्क्याचा मारुती मंदिरसह विविध मंदिरात भक्तांची दर्शनाकरिता मोठी रांग लागलेली होती. नगरपालिका प्रशासनाच्यावतीने शहरात स्वच्छता मोहीम राबवून येणाऱ्या स्वामीभक्तांकरीता शहर स्वच्छ केले होते.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दत्त जयंती निमित्त दर्शनाकरिता आलेल्या लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.