

सोलापूर : महापालिकेच्या हॉस्पिटलमधील रुग्ण पळवापळवी प्रकरणात हात असलेल्या नवी पेठेतील श्रेयश नर्सिंग होम महापालिकेच्या आरोग्य अधिकार्यांनी शुक्रवार, दि. 1 ऑगस्ट रोजी अखेर सील केले. श्रेयश हॉस्पिटलचे सुमित आणि श्रद्धा सुरवसे यांना दिलेली नोटीसची मुदत संपली होती. खुलासा सादर करण्यासाठी डॉक्टर दाम्पत्यांनी वेळ मागितली होती. मात्र मागणी फेटाळून लावत शुुक्रवारी सायंकाळी आरोग्य विभागाच्या पथकांनी हॉस्पिटल सील केले.
दरम्यान, सुमित आणि श्रद्धा सुरवसे दाम्पत्य फरार असल्याची चर्चा कारवाईच्या वेळी चालू होती. हॉस्पिटलच्या नर्सिंग ओपीडी रजिस्टरमध्ये महापालिकेच्या आशा वर्करांना दोन हजार रुपयांपर्यंतचा कट (रक्कम) दिल्याची धक्कादायक नोंदी आढळल्या.
हजर झाले नसल्याने झाली कारवाई
श्रेयश हॉस्पिटलचे सुमित आणि श्रद्धा सुरवसे दाम्पत्यांस चार वाजेपर्यंत महापालिकेत हजर राहण्यास सांगितले होते. मात्र ते आले नाहीत, त्यामुळे सायंकाळी पाच वाजता आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने, वैद्यकीय अधिकारी ज्योत्स्ना कोरे, राजू शिवशिंपी, विजय होटकर, सागर चव्हाण, आशिष सांगवे अशी टीम हॉस्पिटलमध्ये गेली. रितसर पंचनामा करून दोन डॉक्टरांचे कॅबिन आणि एक हॉलसह मुख्य प्रवेशद्वारास कुलूप लावत हॉस्पिटल सील केले.
दाखल पेशंटच्या उपचारांची व्यवस्था
हॉस्पिटल सीलची कारवाई करताना हॉस्पिटलमध्ये एक गरोदर माता आणि कुटुंब कल्याण नियोजनाचे ऑपरेशन झालेली असे दोन पेशंट होते. त्या पेशंटच्या उपचाराची सर्व उपलब्धता करून सदरचे हॉस्पिटल सील करण्याची कारवाई करण्यात आली.