सोलापूर : मंत्र्यांचा दौरा अन्य पदाधिकार्यांना कळवत नाहीत, यामुळे रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्यासमोरच शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकार्यांमध्ये फ्री स्टाईल जुंपली. याठिकाणी बराच वेळ वाद, गोंधळ माजला. अखेरीस मंत्री गोगावले यांनी मध्यस्थी केल्यानंतर तणाव निवळला. ही घटना शनिवारी शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे आणि शिवसेनेचे माजी शहर प्रमुख मनोज शेजवाळ यांच्यात घडली.
मंत्री गोगावले यांनी दुपारी मनीष काळजे यांच्या सात रस्ता येथील कार्यालयाला भेट दिली. तेथेच पत्रकार परिषदही पार पडली. यावेळी आ. सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख उपस्थित होते. त्यानंतर ते शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत होते. या दरम्यान शिवसेनेचे माजी शहरप्रमुख मनोज शेजवाळ आणि त्यांचे कार्यकर्ते शासकीय विश्रामगृहात मंत्री गोगावले यांची वाट पाहत होते. तेथे मंत्र्यांना पोहोचण्यास उशीर होत असल्याचे दिसताच मनोज शेजवाळ थेट काळजे यांच्या कार्यालयात आले. त्यानंतर संतप्त शेजवाळ यांनी काळजे यांना जोरदार सुनावले. मंत्र्यांचा दौरा असताना आम्हाला कळविले का नाही. तिकडे डाक बंगल्यात सर्व कार्यकर्ते वाट पाहात आहेत, असे सुनावताच शेजवाळ आणि काळजे यांच्यात बाचाबाची, शिवीगाळही झाली. त्यातच एका क्षणी एकमेकांत फ्री स्टाईलही झाली. दोघेही एकमेकांच्या अंगावर गेले. यामुळे गोंधळ, आरडाओरडा सुरू झाल्याने कोण काय बोलत आहे हे कुणालाच समजेनासे झाले. हा सर्व प्रकार मंत्री गोगावले यांच्या समोर सुरू होता. मंत्री गोगावले यांनी दोघांना शांत करत प्रकरण संंपविले. यामुळे घटनास्थळाचे वातावरण काहीकाळ तणावपूर्ण बनले.
पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्ष
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सोलापुरात पहिल्यापासूनच अनेक गट-तट आहेत. यामुळे अनेकदा वाद होतात. आज तर त्याचा कळसच झाला. चक्क मंत्र्यांसमोरच आजी-माजी पदाधिकार्यांत शिवीगाळ झाली, फ्री स्टाईल जुंपली. पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची कोणत्या न् कोणत्या वादग्रस्त प्रकरणात नावे पुढे येतात. यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. यावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.