

सोलापूर : शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सोलापूर शहर समन्वयक तथा माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्यासह अकरा जणांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. पक्षाचे लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे यांच्यासह असंबंधित पदाधिकार्यांचा मनमानी कारभार आणि वाढता हस्तक्षेप यामुळे पक्षाची वाताहत होत असल्याचा आरोप दिलीप कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत केला.
कोल्हे म्हणाले, शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर शहर समन्वयक पद मला देण्यात आले. मात्र समन्वयक या नात्याने पक्ष वाढीसाठी वरिष्ठांकडून कोणतीही विचारणा झाली नाही. वरिष्ठांनी बैठक घेतली पाहिजे तसे झाले नाही. शहर समन्वयक असतानाही परस्पर बाहेरील काही पदाधिकारी इतर पदे नेमतात. असंबंधित लोकांचा वाढता हस्तक्षेप आणि मनमानीामुळे पक्षाची वाताहत होत आहे. या संदर्भात मुंबईत वरिष्ठांची भेट घेऊन कैफियत मांडली आहे. वरिष्ठांच्या सूचनांची पायमल्ली होत आहे. महापालिका निवडणुकांसंदर्भात आवश्यक ती संघटनात्मक बांधणी आणि इतर नियोजन गरजेचे आहे. त्या संदर्भात चर्चा नाही. पक्षाच्या वरिष्ठांची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप दिलीप कोल्हे यांनी केला आहे. या पत्रकार परिषदेस राजीनामा दिलेले पदाधिकारी उपस्थित होते.
यांनी दिले राजीनामे
शिवसेना शिंदे गटाचे शहर समन्वयक दिलीप कोल्हे, जिल्हा उपप्रमुख हरिभाऊ चौगुले, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख आशिष परदेशी, सोशल मीडिया शहर प्रमुख सागर शिंदे, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख जवाहर जाजू, युवासेना शहर उपप्रमुख मयूर झांबरे, शिवसैनिक नवनाथ भजनावळे, राहुल काटे यांच्यासह अकरा पदाधिकार्यांनी राजीनामे दिले आहेत.