

दक्षिण सोलापूर : दक्षिण तहसील कार्यालयामध्ये कर्मचार्यांनी नागरिकांसाठी वर्गणीतून निवारा शेड उभा केला आहे. यापूर्वी तहसीलदार किरण जमदाडे यांच्या पुढाकारातून उन्हाळ्यामध्ये सावलीसाठी मंडप उभारण्यात आला होता.
कार्यालयात शासकीय कामासाठी येणार्या अभ्यागत व नागरिकांची संख्या मोठी आहे. अचानक पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची तारांबळ उडत असल्याचे लक्षात आल्यावर सर्वसामान्य लोकांना नेहमी प्रथम प्राधान्य देणारे अधिकारी अशी ओळख असणारे तहसीलदार किरण जमदाडे यांनी कार्यालयाच्या समोरील मोकळ्या जागेत अभ्यागत व नागरिकांसाठी पावसापासून बचावासाठी कायमस्वरूपी चांगला निवारा शेड उभारण्याची संकल्पना मांडली. दक्षिण तहसील कार्यालयात कार्यरत सर्व कर्मचारी, मंडल अधिकारी व तलाठी यांनी एकत्रितपणे वर्गणी गोळा केली. या एकत्रित केलेल्या वर्गणीतून चांगल्या दर्जाचे पत्रे व लोखंडी अँगल च्या सहाय्याने कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला निवारा शेड दोन दिवसांत उभे करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत यापुर्वीच तहसील कार्यालयात येणार्या नागरिकांना विविध सोयी-सुविधा करण्यात आल्या आहेत.