

करमाळा : करमाळा तालुक्यातील शेलगाव ढोकरी रस्ता दुरुस्तीला भारतीय जनता युवा मोर्चाने दिलेल्या आंदोलनाच्या इशार्यानंतर अखेर प्रारंभ करण्यात आला. या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्डयामुळे नागरिकांना याचा त्रास होत होता. आता रस्ता दुरूस्तीला प्रारंभ झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शुभम बंडगर यांनी याबाबत इशारा दिला होता.
शेलगाव ते ढोकरी या 14 कि. मी. रस्त्याच्या विशेष दुरूस्तीची मागणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे शुभम बंडगर यांनी केली होती. त्यावेळी पालकमंत्री गोरे यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे अधिक्षक अभियंता परदेशी यांना तात्काळ काम चालू करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 14 किमी अंतरात ज्या-ज्या ठिकाणी खड्डे आहेत किंवा रस्ता खराब झाला आहे. त्या-त्या ठिकाणचे दुरूस्तीचे काम सुरू केले आहे.
वांगी परिसरातील रस्ता संघर्ष समितीने प्रयत्न करून गतवर्षी मे 2024 मधे या रस्त्याचे विशेष दुरूस्ती अंतर्गत पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत काम मंजूर करून हभप रामभाऊ महाराज निंबाळकर यांच्या हस्ते काम सुरूही केले होते. परंतु तीन ते चार किमी अंतरात कार्पेट केल्यानंतर अचानक काम बंद करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत रस्ता संघर्ष समितीच्या माध्यमातून पंतप्रधान ग्रामसडक योजना कार्यालयाकडे सतत पाठपुरावा चालू असतानाच भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम बंडगर यांनी थेट पालकमंत्री गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे याची कैफियत मांडली. त्या मागणीला आज यश येताना दिसत आहे . यामुळे शुभम बंडगर यांचे अभिनंदन होत आहे.