

मोहोळ शहर : मोहोळ तालुक्यातील सीना नदीकाठच्या शेतीपंपांचा वीजपुरवठा दररोज केवळ दोन तास सुरू राहील, असे महावितरणच्या वतीने सांगण्यात येत असल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आधीच पाणीटंचाई, पावसातील अनिश्चितता आणि शेतीच्या वाढत्या खर्चामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता अपुऱ्या वीजपुरवठ्याचे नवे संकट उभे राहिले आहे. पिकांना पाण्याची नितांत गरज असताना शेतीपंपांना केवळ दोन तास वीज मिळणार असल्याने हातातोंडाशी आलेली पिके वाचवायची कशी, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
मोहोळ तालुक्यातील बोपले, अनगर, नरखेड, पासलेवाडी, गलंदवाडी, खरकटणे, कुरणवाडी, दाईंगडेवाडी, बिटले, एकुरके, मलिकपेठ, मोहोळ, कोळेगाव, घाटणे, भांबेवाडी, आष्टे, हिंगणी (निपाणी) यांसह सीना नदीकाठच्या परिसरातील शेतीपंपांच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या भागातील अनेक शेतकरी शेतीच्या सिंचनासाठी सीना नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र, पाणी उपलब्ध असतानाही पुरेसा वीजपुरवठा मिळाला नाही, तर पिकांना वेळेवर पाणी देणे अशक्य होणार आहे. त्यामुळे महावितरणच्या या घोषणेमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.
शेतीपंपांचा वीजपुरवठा दररोज केवळ दोन तास सुरू राहणार असल्यास प्रत्यक्षात एवढ्या कमी वेळेत संपूर्ण शेतीला पाणी देणे कितपत शक्य होईल, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. नदीकाठच्या भागातील अनेक शेतकऱ्यांकडे मोठ्या क्षेत्रावर पिकांची लागवड असून, पिकांच्या गरजेनुसार सिंचन करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत वीजपुरवठ्याचा कालावधी मर्यादित राहिल्यास पिकांना पुरेसे पाणी मिळणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.
शेतीचे संपूर्ण नियोजन वीजपुरवठ्याच्या वेळापत्रकावर अवलंबून असताना वीजपुरवठ्याचा कालावधी कमी झाल्यास सिंचनाचे वेळापत्रक विस्कळीत होणार आहे. विशेषतः एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांना शेतीपंप सुरू करावे लागल्यास उपलब्ध वेळेत सर्वांना पुरेसा पाणीपुरवठा करणे आणखी कठीण होऊ शकते. त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करून शेतकऱ्यांना पुरेसा वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.