

सोलापूर : सीना नदी पात्रात पंधरा दिवसांपूर्वी पाणी सोडण्यात आले होते. त्यावेळी सीना नदी तुडूंब भरले होते. मात्र 15 दिवसांत सीना नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. नदीपात्रात पाण्यासाठी शेतकरी डबके मारत आहेत. पुन्हा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, पाण्याअभावी पिके करपू लागली आहेत.
उन्हाळा संपेपर्यंंत नदीपात्रात पाणी राहण्याची आशा होती. मात्र वाढत्या तापमानामुळे दिवसरात्र पिकांना पाणी देण्यासाठी शेतीपंपाद्वारे पाण्याचा उपसा करण्यात आला. यामुळे पंधरा दिवसातच सीना नदीपात्रातील पाणी संपून त्याला डबक्याचे स्वरूप आले आहे. पिकेही वाळू लागल्याने शेतीच्या पाण्याच्या प्रश्नावर पुन्हा ओरड होणार आहे. सीना नदी पात्र कधीकधी जून व जुलै महिन्यातही कोरडे पडते. यंदाही उन्हाळ्याच्या प्रारंभी म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या मध्यंतरानंतर कोरडे पडले होते.
शेतकर्यांनी पाणी सोेडण्याच्या मागणीसाठी सिंचन भवनासह अन्य कार्यालयेही गाठले. प्रशासनाकडून नदी पात्रात पाणी सोडण्यात आले होते. पाण्याने नदीपात्र दुतर्फा काटोकाट भरले होते. वातावरणातील वाढत्या उन्हात पाण्याचे झालेले बाष्पीभवन होऊन पाणी वेगाने कमी झाले आणि पंधरा दिवसातच सीनेचे पात्र कोरडेठाक पडले. पाणी संपल्याने पिके करपून जाण्याची भिती शेतकर्यांमधून व्यक्त होत आहे. अद्याप एप्रिलचा महिला संपला नसून पूर्ण मे महिन्यात पाणी प्रश्न भेडसावणार आहे.
मे महिन्यात सीनेच्या काठच्या शेतीसह कांही गावच्या पिण्याचा पाण्याचाही प्रश्न भेडसावणार आहे. जिल्हा प्रशासन सीना नदीपात्रातील पाण्याबाबत कोणती भूमिका घेते याकडे शेतकर्यांसह तेलगाव-सीना, अकोला-मंद्रुप, वांगी, गुंजेगाव, मनगोळी, नंदूर, वडकबाळ, औराद, होनमुर्गी, संजवाड, बोळकवठा नवीन न जुना आणि कोर्सेगाव येथील ग्रामस्थांचे लक्ष लागलेला आहे.