Satara News : वन्यजीवांसाठी उभारले ४०० वनराई बंधारे

सातारा वनविभागाची पर्यावरण संवर्धनासाठी मोहीम : १० तालुक्यात उपक्रम
Satara News : वन्यजीवांसाठी उभारले ४०० वनराई बंधारे
Published on: 
Updated on: 
सागर गुजर

सातारा : सातारा वनविभागाने सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम हाती घेतले आहेत. जिल्ह्यातील १० तालुक्यांमध्ये ४०० वनराई बंधाऱ्यांची कामे पूर्ण करण्यात आली असून, वन्यजीव संरक्षण आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठीही जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुष्‍काळी परिस्‍थितीच्‍या पार्श्वभूमीवर वनविभागाने तयार केलेले वनराई बंधारे वन्‍यजीवांसाठी नवसंजीवनी ठरले आहेत.

पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी स्थानिक पातळीवर अडवून त्याचा उपयोग व्हावा, यासाठी वनराई बंधाऱ्यांची उभारणी महत्त्वपूर्ण ठरते. या बंधाऱ्यांमुळे जलसंधारणाला चालना मिळण्यासोबतच भूजल पुनर्भरण आणि स्थानिक जलस्रोतांच्या संवर्धनास मदत होते. ग्रामीण भागातील पाण्याची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने वनविभागाने या कामांना प्राधान्य दिले आहे. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व स्‍थानिक लोकांच्‍या एकत्रित प्रयत्‍नातू्न हे वनराई बंधारे उभारण्‍यात आले असून बंधाऱ्यांमध्‍ये मुबलक पाणी साठलेले आहे.

दरम्‍यान, यासोबतच जंगलातील स्वच्छता, प्लास्टिक निर्मूलन, जलस्रोत संवर्धन, वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन आणि समाजमाध्यमांद्वारे माहितीचा प्रसार अशा उपक्रमांचाही यामध्ये समावेश आहे. सर्पमित्र व वन्यजीव बचाव पथकांच्या माध्यमातून सापांविषयीचे गैरसमज दूर करणे, सर्पदंश प्रतिबंधाबाबत मार्गदर्शन करणे आणि वन्यप्राण्यांशी सुरक्षित अंतर राखण्याबाबत नागरिकांना माहिती देण्यावर भर दिला जाणार आहे.

वन्यजीव संरक्षणासाठी जनजागृतीची मोहीम

वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने वन्यप्राण्यांचे संरक्षण, जैवविविधतेचे महत्त्व आणि नैसर्गिक अधिवासांचे जतन याविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती रॅली, चित्रकला व निबंध स्पर्धा, व्याख्याने आणि मार्गदर्शन सत्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी संवेदनशीलता निर्माण केली जाणार आहे.

लोकसहभागातूनच पर्यावरण संवर्धनाला व्यापक स्वरूप प्राप्त होऊ शकते. वनसंपदेचे संरक्षण, नैसर्गिक संसाधनांचे जतन आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा.
- अमोल सातपुते उपवनसंरक्षक, सातारा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news