

सोलापूर : विविध कारणांमुळे सोलापूर जिल्ह्यातील 13 गावाच्या मतदार याद्यांचे अंतिम प्रसिध्दीकरण येत्या 24 फेबु्रवारी रोजी होणार आहे. सदस्यत्व अपात्र झाल्याने, राजीनामा दिल्याने, पदावरील व्यक्ती मयत झाल्यामुळे व नामनिर्देशन पत्र प्राप्त न झाल्याने रिक्त असलेल्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुका पुढील काळात होणार आहे.
त्यासाठी जनतेतून सरपंच निवडण्यासाठी 13 गावांची पोटनिवडणूक होणार आहे. यासोबतच विविध कारणास्तव रिक्त झालेल्या 27 ग्रामपंचायत सदस्यांसाठीही पोटनिवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
या पोटनिवडणुकीसाठी 1 जुलै 2025 च्या अर्हता तारखेनुसार उपलब्ध असलेल्या मतदार याद्यांवर ही पोटनिवडणूक होणार आहे. आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी (दि. 16) प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत.
या यादीवर हरकती व सूचना 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान स्वीकारल्या जाणार आहेत. त्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. या पोटनिवडणुकीसाठी फेब्रुवारी अखेरपर्यंत प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.