

सोलापूर : प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत गावातील लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरपंच, पदाधिकार्यांचे सहकार्य अतिशय महत्त्वपूर्ण आहे, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी व्यक्त केली.
उत्तर पंचायत समितीच्या सभागृहामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम बोलत होते. यावेळी डेप्युटी सीईओ अमोल जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी बाबासाहेब पाटील, सोमनाथ शिंदे आदी उपस्थित होते. सीईओ जंगम म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत गावातील लाभार्थ्यांचे घरकुलाचे उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकार्यांनी वेळेत नियोजन करून अंमलबजावणी करावी. तसेच सरपंच आणि पदाधिकार्यांनी यासाठी सहकार्य करून घरकुलांचे कामे पूर्ण करून घ्यावीत.
मार्डी, नान्नज, अकोलेकाटी गावात भेट
उत्तर सोलापूर तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात घरकूल प्रलंबित आहेत, अशा नान्नज, अकोलेकाटी आणि मार्डी ग्रामपंचायतीस भेटी देऊन घरकूल कामांची पाहणी केली. तसेच मार्डी, नान्नज आणि अकोलेकाटी येथील कामांची पाहणी करून घरकुलांचे काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
घरकुलांची कामे तत्काळ सुरू करण्याच्या सूचना
घरकूल लाभार्थ्यांना पाच ते सहा महिन्यापूर्वी पहिला हफ्ता देण्यात आला आहे. तरीही बरेच लाभार्थी अद्यापही घरकुलांचे बांधकाम सुरू न केलेल्या लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे. पुढील 10 दिवसात सर्व लाभार्थ्यांनी बांधकाम सुरू करून दुसरा हफ्ताची तयारी करावी, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी दिल्या आहेत.