

सांगोला : सांगोला तालुक्यात जिल्हा परिषदेचे 7 गट व पंचायत समितीचे 14 गण असून प्रचार संपला आहे. खरी लढत शिवसेनेचे माजी आमदार शहाजी पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या महायुती विरुद्ध शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख व दीपक साळुंखे-पाटील यांची विकास आघाडी यांच्यात आहे. येथे काट्याची लढत असून महायुतीने जबरदस्त आव्हान दिले असले तरी विकास आघाडीने मात्र प्रचारात आघाडी घेतली आहे.
आमदारांपेक्षाही विकासाची कामे ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचवणारी यंत्रणा म्हणजे मिनी मंत्रालय अर्थात पंचायत समिती ही होय. ती 1967 सालापासून शेकापकडे असून ती यापुढेही आपणाकडे राहावी, यासाठी सांगोला तालुका विकास आघाडीने कंबर कसली आहे. सदर मिनी मंत्रालय जर आपल्याकडे आले तर तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्याची स्वप्ने बाळगून असलेली महायुती साम, दाम, दंड, भेद या सर्व नीतीचा अवलंब करून जोमाने कामाला लागलेली आहे. त्यांना प्रतिसादही चांगला मिळत आहे.
पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक ही पंचायत समितीच्या स्थापनेपासून आजपर्यंत स्व. गणपतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लढवून शेकापने जिंकली होती. परंतु, प्रथमच त्यांच्या निधनानंतर ही निवडणूक होत असल्याने बाहेरच्या नेत्यांनी तालुक्यात एन्ट्री करून आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जोपर्यंत गणपतराव देशमुख होते, तोपर्यंत तालुक्यात काँग्रेस, भाजप इतर कोणत्याही पक्षाची मोठी ताकद नव्हती.
स्व. गणपतराव देशमुख यांच्या काळापासूनचे पारंपरिक मित्र दीपक साळुंखे-पाटील यांना बरोबर घेऊन आमदार डॉ. बाबासाहेव देशमुख यांनी गट पिंजून काढला आहे. त्यांना मतदारांतूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत यापूर्वी भाजपला तालुक्यात एजंट मिळत नव्हता. परंतु, यावेळी नगरपालिकेत त्यांनी पाच नगरसेवक निवडून आणले. आता ग्रामीण भागात कमळ फुलविण्यासाठी भाजपने शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी पाटील यांची मदत घेतली आहे. आर्थिकदृष्ट्या प्रबळ असलेले उमेदवार ही त्यांची जमेची बाजू आहे.
एकंदरीत प्रचार शिगेला पोहोचला असून तो अंतिम टप्प्यात आला आहे. सर्वच गट व गणात विकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांनी सभांचा सपाटा लावला आहे. परंतु, काँग्रेस, राष्ट्रवादी दोन्ही पक्षाचे नेते यांनी पत्रक वाटून प्रचार करीत आहेत. रिपाई आठवले गटाचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते यांनी विकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. दलित, मुस्लीम, लोणारी, यलमार व इतर अल्पसंख्याक समाज हा कोणाकडे झुकेल त्यांना विजयाचा कौल असणार हे निश्चित आहे. आधी काम करून मागताहेत मते निवडणूक म्हटले की सभा, भाषणं, आरोप-प्रत्यारोप आणि भविष्यातील आश्वासनं हे नेहमीचं चित्र.
मात्र सांगोला तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची ही पारंपरिक चौकट मोडीत निघाल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसत आहे. भाषणापेक्षा प्रत्यक्ष कामे करून दाखवण्याचा नवा प्रचार फंडा यंदा जोरात वापरला जात आहे. काम आधी, मतं नंतर! नवा फंडा गाजताना दिसतोय. यामुळे पूर्वी निवडून आल्यानंतर काय करणार यावर आधारित असलेला प्रचार आता अडचण सांगा, काम करून घ्या अशा स्वरूपात बदलल्याचे चित्र सांगोल्यात दिसून येत आहे.