

सांगोला : पांढरेवस्ती (जवळा) येथे अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या व्यवसायातील जमावाने मारहाण केली. तसेच शासकीय गाडीवर दगडफेक केली. बुधवारी पहाटे झालेल्या या दगडफेकीत दोन कर्मचारी जखमी झाले असून, शासकीय गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात अतुल गावडी आणि पप्पू बिचुकले या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी यासाठी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन केले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सांगोला तालुक्यातील नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी महसूल विभागाकडे येत होत्या. या अनुषंगाने सांगोला येथील मंडल अधिकारी महेश जाधव, मेडशिंगी तलाठी मयूर गोडसे व वाढेगाव कोतवाल समाधान सूर्यगंध हे येथील पांढरे वस्तीजवळ कोरडा नदीपात्रामध्ये अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी बुधवारी पहाटे गेले होते. यावेळी संशयित अतुल शंकर गावडे व इतरांनी मिळून सांगोला तहसीलदार कार्यालयाच्या वाहनावर (क्र एमएच 45 एएल 8171) दगडफेक करून मोठे नुकसान केले.
दरम्यान, गुन्हा दाखल करून कडक कारवाई होत नाही तोपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये सहभागी होत आल्याची माहिती महसूल कर्मचारी संघटनेने निवेदनाद्वारे दिली आहे. तहसिलदार बाळुताई भागवत यांना निवेदन देण्यात आले. यावर सहाय्यक महसूल अधिकारी सचिन कुंभार राजू बनसोडे व इतर 14 सहाय्यक महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या सह्या आहेत.