

सांगोला : शहरातील वासूद चौक येथील सूर्योदय मोबाईल शॉपी फोडून लाखो रुपयांच्या मोबाईलची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात सांगोला पोलिसांना यश आले आहे. कर्नाटकातील बागलकोट येथून एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून तब्बल 20 मोबाईल जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
23 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्री 1:18 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी सूर्योदय मोबाईल शॉपी या दुकानाच्या वरचा पत्रा उचकटून व पीओपी फोडून आत प्रवेश केला होता. त्यानंतर दुकानातील सुमारे 3 लाख 90 हजार 500 रुपयांचे विविध कंपनीचे मोबाईल फोन लंपास केले होते. याप्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, सायबर तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी चोरीला गेलेल्या मोबाईलपैकी एक मोबाईल ट्रेस केला. त्याच्या आधारे तपासाची दिशा स्पष्ट झाली आणि पोलिसांनी थेट कर्नाटक राज्यातील बागलकोट येथे धाड टाकली. या कारवाईत अक्षय शांताराम इंदुलकर (वय 36, रा. नवनगर, बागलकोट) याला अटक करण्यात आली. आरोपीकडून एकूण 20 मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, त्यांची अंदाजे किंमत 3 लाख 30 हजार इतकी आहे.