

सांगोला : सांगोला नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निवडणुकीबाबतचे उर्वरित कामकाज प्रशासनाकडून उरकून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, नगरपालिका निवडणुका येत्या दोन महिन्यात पूर्ण होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु जुनी नगरपालिका इमारत पाडल्याने सद्यस्थितीत वापरात असलेल्या नगरपालिका इमारतीमध्ये विभागीय कार्यालय बसत नाही. जागेअभावी पत्र्याच्या शेडमध्ये आरोग्य विभागासह इतर प्रमुख विभाग कार्यरत आहेत. तर निवडणूक झाल्यानंतर नगराध्यक्ष व नगरसेवक यांना बसण्यासाठी सभागृह तथा कार्यालय कुठे असणार? असा सवाल आता भावी नगराध्यक्ष व नगरसेवक तसेच सांगोलाकरांकडून उपस्थित केला जात आहे.
सांगोला नगरपालिकेच्या नवीन प्रशस्त इमारतीच्या बांधकामासाठी जुनी नगरपालिका इमारतीचे बांधकाम ऑगस्ट 2024 मध्ये पाडण्यात आले आहे. सध्या कार्यरत असलेल्या नगरपालिका इमारतीमध्ये 7 विभागीय कार्यालयाचे कामकाज सुरू आहेत. यामध्ये मुख्याधिकारी कक्ष, जन्म-मृत्यू नोंदणी विभाग, कर विभाग, खिडकी क्रमांक एक, सभा विभाग, लेखा विभाग, बांधकाम विभाग पहिल्या मजल्यावर पाणीपुरवठा विभाग कार्यरत आहेत. या इमारतीमध्ये इतर कार्यालय सुरू ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने, नगरपालिका कार्यालयाशेजारी पत्राशेडमध्ये अग्निशामक विभागाला चिटकून शेजारी असलेल्या ठिकाणी आरोग्य विभाग, विद्युत विभाग, पंतप्रधान आवास योजना कार्यालय, बचत गट कार्यालय आदी कार्यालय कार्यरत आहेत. नगरपालिकेच्या इतर विभागांना पत्राशेडमध्ये कामकाज करावे लागत असताना नगरसेवकांसाठी नेमकी कोणती जागा पर्याय म्हणून देण्यात येणार, याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत.
कोट्यवधी रुपयांच्या नवीन प्रशस्त इमारतीच्या बांधकामास मंजुरी मिळाल्याची माहिती आहे. या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी ऑगस्ट 2024 मध्ये जुनी इमारत पाडण्यास सुरुवात करण्यात आली. मागील पाच महिन्यांपासून नवीन इमारत बांधकामासाठी कोणतीही युद्धपातळीवर हालचाली दिसून येत नाहीत. केवळ नवीन इमारतीचे बांधकाम होणार आहे, या अपेक्षेवर सांगोलाकर आहेत.
तत्पूर्वी नगरपालिका निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रिया कामी हालचालींना वेग आला आहे. नुकतीच प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीसाठी भावी नगरसेवक तयारीला लागले आहेत. भावी नगरसेवक आतापासूनच मतदारांना रामराम ठोकत आहेत. वाढदिवसाच्या इतर कार्यक्रमात उपस्थिती लावत आहेत.
यामध्ये नगरसेवकांकडून मतदारांना आतापासूनच चहापाणीदेखील होत असल्याची चर्चा आहे. भावी नगरसेवक म्हणून आवर्जून नाव घेत असताना जाणकार मतदारांकडूनदेखील त्यांना निवडून आल्यानंतर तुम्ही कुठे बसणार, असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत भावी नगरसेवक यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळत नसल्याने हा एक चेष्टेचा विषय ठरत आहे.
यावर अनेक भावी नगरसेवकांच्या मनामध्ये सांगोला नगरपालिकेच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर नगरसेवक यांना बसण्यासाठी नगरपालिका कोणता पर्याय देणार, असे एक ना अनेक सवाल उपस्थित होत आहेत. यावर नगरपालिका प्रशासन म्हणून मुख्याधिकारी कोणता पर्याय देणार याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.