

सांगोला : शासनाने निर्गमित केलेल्या निकषाप्रमाणे अतिवृष्टी बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या क्षेत्राचे पंचनामे झाले नाहीत. यामध्ये संबंधित तलाठी, कृषी सहाय्यक, कोतवाल यांनी संगनमताने अतिवृष्टी अनुदानाचा घोटाळा केला आहे. याबाबतची तक्रार हलदहिवडी येथील समाधान चव्हाण व बिभीषण लेंडवे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
ऑक्टोबर 2025 मध्ये अतिवृष्टी पावसाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या फळबागा व शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याबाबत, शासनाच्या निकषाप्रमाणे पंचानामे न होता, ज्यांचे क्षेत्र कमी आहे. त्यांना अनुदान रक्कम मोठ्या प्रमाणात मिळाली तर ज्या शेतकऱ्यांचे बाधित क्षेत्र जास्त त्यांना अनुदानाच्या रकमा कमी मिळाल्या आहेत. याशिवाय ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पीक नाही, अशा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान रक्कम देण्यात आली आहे. याला सर्वस्वी जबाबदार हलदहिवडी येथील कोतवाल, तलाठी व कृषी सहाय्यक यांनी संगनमत करुन अपहार केला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे केले नाहीत. शेतकऱ्यांसोबत तडजोड करुन अनुदानाचे क्षेत्र निश्चित केले आहे. त्यामुळे हा ठरवून केलेला भ्रष्टाचार असल्याचे आरोप करीत, अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची सखोल चौकशी सक्षम प्राधिकारी यांच्यामार्फत चौकशी करावी. संबंधित कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होऊन योग्य कारवाई करण्यात यावी. असे न झाल्यास इतर सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.