Ganpatrao Deshmukh House : सांगोला हादरलं! गणपतराव देशमुख यांच्या घरावर दारूची बाटली फेकल्याने शहरात तणाव; शेकापनं दिली बंदची हाक
Ganpatrao Deshmukh House :
शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) आणि सांगोल्याचे दैवत मानले जाणारे दिवंगत ज्येष्ठ नेते माजी आमदार गणपतराव देशमुख (आबासाहेब) यांच्या निवासस्थानावर अज्ञात समाजकंटकाने दारूची बाटली फेकल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. या निंदनीय कृत्याच्या निषेधार्थ शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) आज (शनिवार) सांगोला बंदची हाक दिली आहे.
गणपतराव देशमुखांच घर मंदिरासमान
या घटनेनंतर देशमुख समर्थक आणि शेकाप कार्यकर्ते तीव्र आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी 'आबासाहेब अमर रहे' अशा घोषणा देत आबासाहेबांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला. तसेच, ज्या घराला संपूर्ण तालुक्यात देवत्व आणि मंदिर मानले जाते, त्या घराची बाटली फेकल्यामुळे शुद्धीकरण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी घर पाणी आणि दुधाने स्वच्छ केले.
शेकाप नेते बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले की, "या तालुक्यातली तमाम जनता आबासाहेबांना देवाच्या रूपात पाहते. अशा घरात हे चुकीचे कृत्य घडले. संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप आहे, त्यामुळे नाईलाजाने आम्हाला शांतताप्रिय असूनही बंदची हाक द्यावी लागली."
शांततेत बंदचे आवाहन
दिवाळीचा सण तोंडावर असून, अतिवृष्टीचे सावट असताना बंदमुळे गोरगरीब जनतेची अडचण होऊ नये, याची जाणीव असतानाही जनभावनेच्या दबावामुळे बंद पुकारल्याचे बाबासाहेब देशमुख यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगोला तालुक्यातील सर्व जनतेला आणि तरुणांना हा बंद शांततेत पार पाडण्याची विनंती केली आहे.
नेत्यांकडून घटनेचा निषेध
भाजपचे पालकमंत्री तसेच खासदार नाईक निंबाळकर यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. पालकमंत्र्यांनी प्रशासनाला तातडीने कठोर कारवाईच्या सूचना दिल्या असून, "ज्याने कोणी हे कृत्य केले असेल, त्याला शोधून योग्य शासन झाले पाहिजे," अशी मागणी करण्यात आली आहे.
कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करताना म्हटले की, "५५ वर्षे आबासाहेबांनी शांतताप्रिय कारभार केला. कुणाची सुपारी घेऊन जर असे कृत्य केले असेल, तरी आबासाहेबांचा शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार तालुक्यातून पुसणार नाही." या घटनेमुळे सांगोला शहरात तणावाची परिस्थिती असून, पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.

