

सोलापूर : दुभाजकांमधील वृक्षारोपणाचे ऑडिट करण्यासाठी सांगलीच्या वालचंद इंजिनीअरिंग कॉलेजची टीम बुुधवारी (दि. 11) सोलापुरात येणार होती. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आपले अपयश लपवण्याठी दुभाजकामधील जळालेल्या वृक्षांच्या जागी नवीन लागवड करण्याचा प्रताप केला आहे. दुसरीकडे टीम आली की नाही, याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे.
महापालिकेच्या वतीने शहरातील 24 दुभाजकांमध्ये वृक्षारोपण करण्याचे काम केले आहे. या कामामध्ये अनियमितता असल्याचा आरोप केल्याने या कामांचे थर्डपार्टी ऑडिट करण्याचे आदेश महापालिका आयुुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले होते. त्यानुसार तपासणी करण्यासाठी सांगलीच्या वालचंद इंजिनीअरिंग कॉलेजची टीम बुुधवारी सोलापुरात येणार होती. त्यासाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सकाळी 12 वाजता उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या होत्या. तसे पत्र दैनिक ‘पुढारी’लाही दिले होते.
दुपारच्या सुुमारास टीमला येण्यास उशिर होणार असल्याचे फोनवरुन महापालिका प्रशासनाने सांगितले. टीम आली की नाही? थर्डपार्टी तपासणी चालू झाली की नाही? याची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तपासणीसाठी टीम सोलापुरात आली असेल तर या दौर्याची गुप्तता का पाळली जात आहे. असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. रस्ते दुुभाजकामध्ये लावण्यात आलेल्या वृक्षाच्या ठिकाणी नवीन वृक्ष लागवड केली जात असल्याचे बुुधवारी निदर्शनास आले. त्यामुुळे रस्ते दुभाजकामध्ये वृक्षलागवडीचे पितळ उघडे पडण्याची शक्यता असल्याने नव्याने वृक्षलागवडीचा उद्योग केला असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाची महापालिका आयुक्तांनी लक्ष घालून चौकशी करण्याची मागणी होत आहे.
महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीने रस्ते दुभाजकामध्ये 21 हजार वृक्ष लावण्याचा मक्ता दिला होता. दोन कोटींची निविदा आहे. व्हीआयपी रोड वगळता सर्व रस्ते दुभाजक ओसाड पडले होते. यातील माती गायब झाली आहे. या दुभाजकांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साठला होता. हे सर्व रस्ते दुभाजक दुरुस्त करून यामध्ये नवीन झाडे लावण्याचा मक्ता होता. जवळपास 80 टक्के वृक्ष जळून गेले आहेत. नवीन माती न टाकता त्याच मातीमध्ये वृक्ष लागवड केल्याच्या तक्रारी होत्या. येणारी टीम रस्ते दुुभाजकातील मातीचे परिक्षण, लागवड यांची तपासणी करणार आहे.