

सांगोला : रेल्वे क्रमांक 11411 व 11412 परळी सांगली डेमो एक्सप्रेस रेल्वेस जवळा स्टेशनवर थांबा मिळावा, अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
सांगली मधून परळीकडे जाण्याकरीता रात्रीची शेवटची ही ट्रेन आहे. सद्य परिस्थितीत प्रवाशांना एकतर जत रोड किंवा सांगोला येथे उतरून परत उलट दिशेने खाजगी वाहनाने रात्री अपरात्री प्रवास करावा लागतो. सदरच्या उलट प्रवासामुळे या परिसरातील प्रवासी त्रस्त आहेत. सर्वसामान्य लोक जे हॉस्पिटलसाठी रोज ये जा करतात. त्यांची येण्याची व जाण्याची सोय थांब्यामुळे होणार आहे. जवळा स्टेशनला अधिकृत थांबा दिल्यानंतर मानेगाव, निजामपूर, डोंगरगाव, सोनंद, जवळा, बुरंगेवाडी, भोपसेवाडी, आगलावेवाडी, तरंगेवाडी, हून्नूर, भोसे, घेरडी या सर्व मोठ्या गावातील लोकांची दररोज सोय होणार आहे. रेल्वेचेही पर्यायाने उत्पन्न वाढणार आहे. दवाखाना आणि दैनंदिन कामासाठी रोज प्रवाशांना जाण्यासाठी हा थांबा गरजेचा आहे.
जवळा स्टेशनवरून बाकी गावांमध्ये जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था येथून आहे. सांगली वरून येताना या रेल्वेस जत रोड येथून थेट सांगोला थांबा असल्याने दरम्यानच्या गावातील नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी दोन्ही साईड वरून जवळा स्टेशन थांबा तात्काळ मंजूर होणे गरजेचे आहे. या गाडीस एकूण 450 कि.मी.च्या अंतरात साधे डबे वापरण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वेने डबे दहलावेत अन्यथा रेल्वे प्रशासनाने या गाडीचे तिकीट दर एक्सप्रेसचे न ठेवता पॅसेंजरचे दर ठेवावेत, अशी मागणी प्रवाशातून होत आहे. या मागणीची दखल न घेतल्यास रेल्वे प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन करणार असल्याचे शहीद अशोक कामटे संघटनेने सांगितले.