Sane Guruji : अस्पृश्यांसाठी विठ्ठल मंदिर प्रवेश खुला करणारे साने गुरुजी

निमित्त पूज्य साने गुरुजी स्मृतीदिनाचे
Sane Guruji
Sane Guruji
Published on
Updated on

विठोबा हा कष्टकऱ्यांचा देव, राबणाऱ्यांचा पाठीराखा. मात्र त्या मंदिरात अस्पृश्य मानल्या जाणाऱ्यांना प्रवेश नव्हता. जसंजसं स्वातंत्र्य जवळ येऊ लागले, तसंतसं या मंदिरप्रवेशाविषयीची चर्चा वाढू लागली. पंढरपूरच्या मंदिरातील बडव्यांनी अस्पृश्यांच्या या प्रवेशाला जोरदार विरोध केला. त्यांच्या साथीला तत्कालिन सनातनी मंडळी उभी होती. अशावेळी स्वत: ब्राह्मण जातीतून आलेला एक ‘पांडुरंग’ गांधीवादी मार्गाने अस्पृश्यांच्या मानवी हक्कांसाठी म्हणून सनातनी व्यवस्थेच्या विरोधात उभा ठाकलेला पहायला मिळाला. साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांनाही प्रवेश मिळावा म्हणून मोठं आंदोलन उभे केले. स्वांतत्र्याच्या पूर्वसंध्येलाच म्हणजेच जानेवारी १९४७ ते मे १९४७ मध्ये हे आंदोलन करण्यात आले होते.

साने गुरुजी म्हणतात, “पंढरपूर मंदिर मोकळे व्हावे. पांडुरंगाच्या पायी हरिजनांना डोके ठेवता यावे, यासाठी आज मी एकादशीपासून उपवास करत आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या व्यवस्थापकांना माझी विनंती आहे की, त्यांनी देवाजवळ सर्व लेकरांस येऊ द्यावे. तशी त्यांनी घोषणा करावी. तोपर्यंत मी उपवास करत राहीन.” साने गुरुजींच्या उपोषणामुळे मात्र खळबळ उडाली होती. पंढरपूर म्हणजे प्राचीन तीर्थक्षेत्र. लाखो वारकरी दरवर्षी पांडुरंगाच्या दर्शनासाठी इथे येतात. ज्ञानोबा-तुकोबांच्या बंडखोर संतपरंपरेचा वारसा या वारीला आहे. तरीही समाजाचा मोठा घटक असलेल्या दीनदलित समाजाला या दर्शनापासून वंचित ठेवले जात होते. इतक्या वर्षाचा अन्याय मोडून काढायचे साने गुरुजींनी ठरवले. त्यासाठी आधी महाराष्ट्रात जनजागृती करण्यात आली. त्यामध्ये गुरुजींना मोठा पाठिंबा मिळाला.

अखेर १ मे १९४७ ला एकादशीच्या मुहूर्तावर साने गुरुजींनी पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आमरण उपोषणाला सुरुवात केली. पण या उपोषणाच्या विरोधात देशभरातून सनातनी मंडळी पंढरपूरला गोळा झाली. स्वातंत्र्याच्या तोंडावर गुरुजी हा कसला अपशकून करत आहेत असं काही जणांचं म्हणण होतं. समाजवादी विचारांच्या साने गुरुजींना कशाला हवा मंदिर प्रवेशाचा मुद्दा वगैरे टीका झाली.

“जावो साने भीमा पार, नही खुलेगा विठ्ठलद्वार” अशा घोषणांनी साने गुरुजीना काळे झेंडे दाखवण्यात आले. खुद्द म. गांधीजींना साने गुरुजींच्या आंदोलनाबद्दल गैरसमज करून देण्यात आला. म. गांधीजींनी गुरुजींना ताबडतोब हे उपोषण थांबवा अशी तार पाठवली. साने गुरुजी ज्यांना आपला नेता मानायचे आणि ज्यांच्या मार्गाने हे आंदोलन सुरू होतं, त्या म. गांधींजींच्या मनात मात्र, या आंदोलनाविषयी गैरसमज झाले होते. मात्र मध्यवर्ती कायदे मंडळाचे अध्यक्ष दादासाहेब मावळकर यांनी व इतरांनी गांधीजींचा गैरसमज दूर केला आणि बडवे-उत्पात मंडळींनाही परोपरीने समजावले. तेव्हा त्यांनी मंदिर उघडण्याला आपण तयार असल्याचा प्रतिज्ञालेख न्यायालयात दिला. एव्हाना गुरुजींच्या उपवासाचे दहा दिवस पूर्ण झाले होते. मंदिर प्रवेशाच्या मार्गातील बडव्यांचा अडथळा दूर झाल्यानंतर साने गुरुजींनी १० मे १९४७ रोजी रात्री आठ वाजून ३० मिनिटांनी उपोषण सोडले.

महात्मा गांधींना हे वृत्त समजले तेव्हा प्रार्थना सभेत ते म्हणाले, “आज आणखी एक आनंदाची बातमी झाली आहे, पंढरपूरचे पुरातन आणि प्रसिद्ध मंदिर इतर हिंदू मंदिरांप्रमाणेच हरिजनांसाठीही खुले झाले. याचे खास श्रेय साने गुरुजींना आहे. हरिजनासाठी हे मंदिर उघडावे म्हणून त्यांनी आमरण उपवास आरंभला होता. त्यास यश मिळाले आहे.

साने गुरुजी हे लढवय्ये होते. क्रांतीसेनानी होते. स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांचे योगदान अमूल्य आहे. मात्र त्यापलीकडे गुरुजींनी शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी आणि दलितांसाठी दिलेले लढे जास्त निर्णायक ठरले होते. त्यातलाच एक लढा हा ‘पंढरपूरच्या मंदिर प्रवेशाचा लढा’ आहे. १ ते १० मे १९४७ दरम्यान प्राणांतिक, आमरण उपोषण केले. हे उपोषण संत तनपुरे महाराज मठात करण्यात आले. जेथे आमरण उपोषणाचा लढा सुरू केला. तेथेच साने गुरुजींचे स्मारक उभारण्यात आले आहे.
- सिध्दार्थ ढवळे, पंढरपूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news