

सोलापूर : किल्ले रायगड येथे सहा जूनला होणारा राज्याभिषेक सोहळा नामशेष झाला पाहिजे, असे विधान संभाजी भिडे यांनी केल्याने राज्यात त्याचे पडसाद उमटले आहेत. सोलापुरातील मराठा समाज भिडेंच्या विरोधात आक्रमक झाला आहे. सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, राजन जाधव, विनोद भोसले यांनी भिडेंच्या विधानाचा समाचार घेत सहा जूनला रायगडावरचा राज्यभिषेक सोहळा रोखण्यासाठी तेथे पाय ठेऊनच दाखवावा, असे खुले आव्हान भिडेंना दिले आहे.
अखंड हिदूस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ले रायगड येथे सहा जूनला राज्यभिषेक सोहाळा साजरा केला जातो. राज्यातून मोठ्या प्रमाणात शिवभक्त किल्ले रायगडावर येतात. अनेक वर्षांपासून ही परंपरा चालू आहे. मात्र भिडेंनी दोन दिवसांपूर्वी राज्यभिषेक सोहळ्याविषयी विधान करून राज्यात वांदग निर्माण केले आहे.
किल्ले राजगडावरील राज्याभिषेक सोहळा नामशेष झाला पाहिजे, सहा जूनऐवजी तिथीप्रमाणेे राज्यभिषेक सोहळा झाला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामधील ‘नामशेष झाला पाहिजे‘ हे विधान शिवप्रेमींच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळे भिडेंच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. प्रशांत कोरटकर, राहुुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधानावेळी भिडे मूग गिळून गप्प का होते. असा प्रतिप्रश्न भिडेंना विचारला आहे.
भिडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जगतात. महाराजांची बदनामी करतात. त्यांना महाराष्ट्रात फिरू देऊ नये. तोंडाला काळे फासून प्रत्येक जिल्ह्यातून धिंड काढली पाहिजे.
राजन जाधव, समन्वयक, सकल मराठा समाज
छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवप्रेमींमध्ये असलेले वलय कमी करण्याचा प्रयत्न भिडेंच्या माध्यमातून केला जात आहे. त्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत. बहुुजन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा त्यांचा उद्योग आहे.
विनोद भोसले, शिवभक्त