समर्थ रामदासांचा दासबोध : अ वन मोटिव्हेशनल गाईड

Samarth Ramdas Navami 2025 | समर्थ रामदासांचा दासबोध : अ वन मोटिव्हेशनल गाईड
Samarth Ramdas Navami 2025
समर्थ रामदास(file photo)
Published on
Updated on
संजय पाठक, सोलापूर

राम आणि हनुमंताचे निस्सीम भक्त असलेले समर्थ रामदास स्वामी दूरदृष्टीचे द्रष्टे संत होत. समर्थांनी स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम याबरोबरच आजच्या काळातही लागू पडतील अशा जीवन जगण्याच्या पद्धती, रिती अन् आजच्या भाषेत बोलायचे झाले तर टीप्स १६ व्या शतकात दासबोधच्या माध्यमातून दिल्या आहेत. आज (शनिवार) दासनवमीच्या पार्श्‍वभूमीवर हा विशेष लेख...

आपल्या संस्कृतीतील प्रत्येक प्राचीन ग्रंथाचा पुस्तकाचा मूळ उद्देश हा समाज प्रबोधन असल्याचे दिसून येते. त्याबरोबरच अंधश्रद्धा निर्मूलन, सकारात्मक विचारांची पेरणी, सद्वर्तन या व यासारख्या मुद्यांच्या अवतीभवतीही या लेखनाची गुंफण दिसते. त्यामुळेच ते सर्व ग्रंथ, पुस्तके हजारो, शेकडो वर्षानंतर आजही कालसुसंगत वाटतात. याचे आदर्श उदाहरण म्हणून समर्थ रामदास स्वामी लिखित दासबोध या ग्रंथाचा उल्लेख करता येईल.

दासबोध याचा थेट अर्थ ‘शिष्याला उपदेश’ होऊ शकतो. या अद्वितीय ग्रंथाचा आजच्या युगाच्या दृष्टीने अर्थ लावता येतो. हा ग्रंथ वैयक्तिक व समाजिक विकासासह राष्ट्र उन्नतीत योगदाची प्रेरणा मनामध्ये उत्पन्न करणारा आहे. दासबोध हा ‘मोटिव्हेशनल गाईड’ आहे असे म्हटले तर ते अधिक योग्य होईल.

साधे राहा, सोशल मीडियावर उगाच व्यक्त होऊ नका : समर्थ रामदास पहिल्याच समासात सांगतात, साधें वोषध गुणवंत । साधे बोलणे सप्रचित । होता होईल तितके साधे राहा. उगाच उंची कपडेलत्ते, दागने परिधान केल्याचे, स्वतःचे वैभव सगळ्यांना सांगत बसू नकात. दुसर्‍याशी बोलताना बडेजावपणा न दाखवता साधेपणाने, चांगुलपणाने बोला. ज्ञानमार्ग, कर्ममार्ग कदापि सोडू नका. अतिवाद करू नका. स्वतःचे थोरपण स्वतःच जगाला सांगत बसू नका. हल्ली हेच फेसबुक, व्हॅटस्अ‍ॅप, इस्टाच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणावर सुरू आहे. ते टाळण्याचा समर्थांचा सोळाव्या शतकातील सल्ला आजही लागू पडतो.

समाजसेवा करा, नीतिमत्ता बाळगा : दुसर्‍यास सुखी करावे । तेणें आपण सुखी व्हावें । दुसर्‍यास कष्टवितां कष्टावें । नीतिमत्तेस धरूनीयां । यातून समर्थ रामदास सांगतात दुसर्‍याच्या सुखासाठी झटा. त्यातूनच आपण सुखी होऊ. समाजहितासाठी झिजत असतानाच आपल्यातील नीतिमत्ता शाबूत ठेवा. नाहीतर हल्ली समाजसेवेच्या नावखाली नीतिमत्तेचे धिंडवडे उडवणारे अनेक निर्माण झाले आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर समर्थांचा हा समाजसेवा व नीतिमत्ताविषयक समाज खूप बोलका आहे.

सार्वजनिक जीवनात चारित्र्यसंपन्न राहा : समर्थ रामदास दासबोधातील पाचव्या समासात म्हणतात, लावण्य स्त्रियांचे ध्यान । कामाकार जालें मन । कैचें आठवेल ध्यान । इश्‍वराचें । जीवनी असावे चारित्र्यवान । तेणेच इशप्राप्ती होय । यातून समर्थ संदेश देतात की स्त्रियांपासून लांब राहा. तुमच्या मनातूनच हा विषय संपवून टाका. तरच तुम्हाला ईश्वराच्या अर्थात तुमच्या दैनंदिन कामात रस वाटेल. अन्यथा तुम्ही स्त्री अन् त्याविषयात गुंतून जाल. आजच्या काळात सार्वजनिक जीवनात काम करणार्‍या प्रत्येकास, अगदी विविध ऑफिसमध्ये कार्यरत प्रत्येक स्त्री-पुरुषांस समर्थांचा हा जणू संदेशच आहे.

कर्तव्य आणि जबाबदारी : नित्यनेम सांडू नये । अभ्यास बुडों देऊं नये । परतंत्र होऊं नये । कांहीं केल्यां । या समासात समर्थ कर्त्यव्याची, जबाबदारीची जाणीव करून देतात. ऑफिस असो की घर, अथवा कर्तव्याचे कोणतेही ठिकाण अशा ठिकाणी नित्यनेम सोडायचा नाही. अभ्यास या शब्दाचा थेट अर्थ आपले कर्तव्य असा घेत सध्याच्या काळात आपापले कर्तव्य पार पाडणे असा होतो. आपण जर आपले कर्तव्य पार पाडले नाही तर आपल्याला परावलंबी व्हावे लागते. आणि परावलंबित्व हे स्वातंत्र्य गमावणारे असते. एकदा का स्वातंत्र्य गमावले की जीवन व्यर्थच ठरते. यासाठी प्रत्येकाने आपापली कर्तव्ये, जबाबादरी याची जाणीव ठेवावी हेच समर्थांना यातून सांगायचे आहे. जे की आजच्या काळातही लागू होते.

एकूणच समर्थ रामदास हे काळाच्याही पुढेच पाहणारे हे थोर युगपुरुष, संत होत. त्यांचा दासबोध हा ग्रंथ आजच्या काळातही प्रत्येक प्राणिमात्रास जीवन मार्गदर्शक ठरू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news