

अनिकेत गायकवाड
सोलापूर : आजच्या काळात लग्न म्हटलं की डोळे दिपवणारा झगमगाट, कोट्यवधींचा खर्च आणि श्रीमंतीचे प्रदर्शन असे समीकरणच बनले आहे. मात्र, या बडेजावाला पूर्णपणे फाटा देत सोलापूरचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी आपल्या कन्येचा विवाह केवळ १५० रुपयांत पार पाडून समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे. लग्नाचा अवाढव्य खर्च टाळून वाचवलेले लाखो रुपये विनाअनुदानित शिक्षकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि कल्याणासाठी देऊन त्यांनी एक नवा पायंडा रचला आहे.
दत्तात्रय सावंत यांची कन्या सुषमा (एमएससी, ह्युमन ॲनाटोमी) आणि पाणी पुरवठा विभागातील शासकीय अभियंता शुभम शिंदे या दोन्ही उच्चशिक्षित तरुण-तरुणींनी 'विवाह नोंदणी' पद्धतीने आपले सहजीवन सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. सोलापुरातील जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात अगदी साध्या पद्धतीने, मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. आजच्या काळात उच्च पदावर असूनही या दांपत्याने घेतलेला हा निर्णय त्यांच्या प्रगल्भ सामाजिक जाणीवेची साक्ष देतो.
माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी आयुष्यभर शिक्षकांच्या हक्कासाठी लढा दिला आहे. अनेक शिक्षक वर्षानुवर्षे विनाअनुदानित तत्वावर, मानधनाशिवाय किंवा अत्यंत तुटपुंज्या पगारावर ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत. कित्येक शिक्षक तर विनाअनुदानित अवस्थेतच निवृत्त झाले, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबासमोर आर्थिक प्रश्न आ वासून उभे आहेत.
हीच वेदना ओळखून, लग्नाचा खर्च टाळून वाचलेली लाखो रुपयांची रक्कम अशा गरजू शिक्षकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या विवाहासाठी मदत म्हणून देण्याचा संकल्प या दांपत्याने केला आहे. आयुष्यातील आनंदाचा क्षण या कष्टकरी 'गुरुंजीच्या' मुलांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्यासाठी समर्पित करून त्यांनी एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त केली आहे.
‘‘माझ्या वडिलांनी आयुष्यभर ज्या शिक्षकांसाठी संघर्ष केला, त्यांच्या कुटुंबाच्या सुख-दुखात सहभागी होणे हे माझे कर्तव्य आहे,’’ अशी भावना नवरी मुलगी सुषमा सावंत हिने व्यक्त केली. हा केवळ विवाह नसून एका सामाजिक कृतज्ञतेचा सोहळा ठरला आहे.
उच्चविद्याविभूषित तरुण जोडप्याने घेतलेला हा निर्णय आणि सावंत-शिंदे परिवाराची ही दातृत्वशक्ती पाहून सर्वच स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हा आदर्श इतर धनदांडग्या विवाहांच्या डोळ्यांत अंजन घालणारा ठरला असून, "माणुसकीचा शाही थाट" कसा असावा, हेच या निमित्ताने दिसून आले आहे.