Rohit Pawar Protest: नामदेव पायरीवर नतमस्तक होत सुरू केले आंदोलन

सरकारला सद्‌बुध्दी देण्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणीला घातले साकडे
Rohit Pawar Protest: नामदेव पायरीवर नतमस्तक होत सुरू केले आंदोलन
Published on
Updated on

पंढरपूर : शेतकरी कर्जमाफी योजना फसवी आहे. जाचक अटींमुळे शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे जाचक अटी काढून सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी. या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आ. रोहित पवार यांनी पंढरपूर येथे नामदेव पायरीवर नतमस्तक होऊन सरकारला सदबुध्दी देण्याचे विठ्ठलाला साकडे घातले. अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला शेतकऱ्यांचा तसेच राज्यभरातील विविध पक्ष, संघटना यांचा पाठिंबा मिळत असल्याने या आंदोलनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

राज्य सरकारला आ. रोहित पवार यांनी कर्जमाफीतील नियम व अटी काढून सरसकट कर्जमाफी करावी. अन्यथा पंढरपूर येथे विठ्ठलाच्या नगरीत अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र, सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शुक्रवारी आ. पवार यांनी हजारो शेतकऱ्यांसह विठ्ठल मंदिरासमोरील नामदेव पायरी येथे साकडे घालून सरकारला सदबुध्दी देण्याची मागणी केली. यानंतर आंदोलनस्थळी येत छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर यांचा पुष्पहार अर्पण करत आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार असल्याचा इशारा दिला आहे.

या मागण्यांसाठी अन्नत्याग

२०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजारांपर्यंतच्या कर्जमाफीची मर्यादा घालण्यात आली आहे. ही अट रद्द करावी. सर्व शेतकऱ्यांना सरसकट दोन लाखांपर्यंत कर्जमाफी द्यावी. एकवेळ कर्ज प्रकरणात २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांवरील ५० हजारांची मर्यादा सरकारने आता घातली आहे. ती हटवून त्यांनाही सरसकट २ लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळावा. २०१७ च्या कर्जमाफीसाठी पात्र असूनही केवळ कागदपत्रांअभावी लाभ मिळण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी मंजूर करण्यात यावी. पीकविमा योजनेतील शेतकरी विरोधी जाचक 'ट्रिगर' अटी काढून टाकून, '१ रुपयांत पीकविमा योजना' पुन्हा लागू करण्यात यावी. चालू हंगामाच्या पेरणीपूर्वी सर्व शेतकरी कर्ज खात्यांचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यात यावी.

मध्यस्थीसाठी पालकमंत्री नकोत

सरकारकडून मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी कृषी मंत्री, सहकार मंत्री, महसूल मंत्री तसेच मुख्यमंत्री चालतील, मात्र सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नकोत, असे म्हणत आ. रोहित पवार यांनी कर्जमाफीसाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनाला स्टंटबाजी म्हणणाऱ्या पालकमंत्र्यांवर एक प्रकारे टीका केली आहे.

आ. अभिजित पाटील म्हणाले की, मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचाच आमदार आहे. कोणी काहीही म्हणो. आ. रोहित पवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सक्रीय सहभागी आहे. शेतकऱ्याची पोरं म्हणून आम्हाला 'लोकप्रतिनिधी' म्हणून निवडून दिले आहे. आम्ही शेतकऱ्यांची लेकरं आहोत, शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत आम्ही सर्वजण सोबत आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने उभा असलेला मी कार्यकर्ता आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही अटी-शर्ती न लावता सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, तसेच शेतीमालाला हमीभावाची प्रभावी हमी मिळावी. शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठोस निर्णय शासनाने तातडीने घ्यावेत, हीच या आंदोलनाची भूमिका आहे.
- आ. अभिजित पाटील, आमदार, माढा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news