

Maharashtra reels star Rohini Paradhye death case investigation
मंगळवेढा: सोशल मीडियावर आपल्या रिल्सच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय रिल स्टार रोहिणी पाराध्ये आत्महत्या प्रकरणात तब्बल २३ दिवसांनंतर एक मोठे आणि धक्कादायक वळण आले आहे. रोहिणीच्या मृत्यूला जबाबदार धरत, तिचा पती निलेश पाराध्ये याच्यावर मंगळवेढा पोलिसांत अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमके प्रकरण काय?
गेल्या २६ मे रोजी रोहिणी पाराध्ये हिने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती. या घटनेने सोशल मीडिया विश्वात मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातीला ही घटना आकस्मिक वाटत असली तरी, आता मयत रोहिणीचे वडील बाळू शिवशरण यांनी केलेल्या तक्रारीमुळे या प्रकरणाने गंभीर स्वरूप धारण केले आहे.
पतीच्या छळाचा आरोप
वडील बाळू शिवशरण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पती निलेश पाराध्ये याने रोहिणीचा वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ केला होता. याच छळाला कंटाळून रोहिणीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पोलीस कारवाई या फिर्यादीच्या आधारे मंगळवेढा पोलिसांनी निलेश पाराध्येविरुद्ध BNS कलम १०८, ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर करत आहेत. रोहिणीच्या अकाली निधनाने तिच्या चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, आता पोलीस तपासात पतीच्या छळाचे नेमके स्वरूप काय होते, हे लवकरच स्पष्ट होईल, अशी शक्यता आहे.