

निमगाव : सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांच्यावतीने निमगाव ते निमगाव पाटी या पाच किमी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम करण्यात आले होते. ऊस वाहतूक सुरू होताच हा रस्ता जागोजागी पूर्णपणे उखडला होता. या निकृष्ट कामाबद्दल दैनिक पुढारीच्या माध्यमातून वारंवार आवाज उठविला होता. निमगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतही हे काम ठेकेदाराने नव्याने करावे, असा ठराव संमत झाला होता.
राष्ट्रवादी युवकचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष प्रताप मगर, किसान सेल अध्यक्ष दत्ता मगर, सामाजिक कार्यकर्ते महादेव मगर व ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. याची दखल घेऊन या रस्त्यास परत एकदा डांबरीकरण करण्यात आले. निमगाव ते अकलूज हा राज्य महामार्ग असून निमगाव, चांदापुरी, पठाणवस्ती, पिलीव, कुसमोड यासह प्रमुख गावाला जाणारा व सांगली आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा मुख्य मार्ग आहे.
या परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने ऊस वाहतुकही आहे. यामुळे निकृष्ट काम झाल्याचे दिसून आले. त्यामुळे हा रस्ता पुन्हा करण्यात आला. या कामाची पाहणी माजी चेअरमन नागनाथ मगर, शिवप्रेमी तरूण मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण पवार, प्रभाकर मगर, प्रतापराव मगर, रामभाऊ मगर, ज्ञानेश्वर जाधव, राज मगर, बापूसाहेब मगर, किरण मगर, संजय मगर यांनी केली. रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले. लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांचे आभार मानले.