

सोलापूर : राज्यामध्ये रेडीरेकनर दरात वाढ झाली आहे. इतर शहरांच्या तुलनेत सोलापूरमध्ये सर्वाधिक रेडीरेकनर दर आहे. त्यामुळे घरांचे स्वप्न आणखी महागले आहे. घर साकारण्यासाठी खिशाला अधिक झळ सोसावी लागणार आहे.
सोलापूर शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या नवी पेठ या क्रीम एरियामध्ये सर्वाधिक रेडीरेकनर दर आहे. जुळे सोलापूर हा भाग मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. या भागामध्ये नवनवीन गृहसंकुले होत असल्याने या भागातील रेडीरेकनर दर वाढला आहे. सात रस्ता, सैफूल, विजापूर रोड, विमानतळ परिसरात मोठमोठे व्यापारी संकुल, गृहनिर्माण प्रकल्प तयार होत असल्याने वेगवेगळे दर आहेत.
राज्यातील रेडीरेकनर दर ठरवताना 2017-18 साली वार्षिक मूल्यावर आधारित दर तयार केले होते. त्यानंतर सलग दोन वर्षे स्थावर मिळकत क्षेत्रातील मंदीचा विचार करून 2018-19, 2019-20 साठी सदरचे दर कायम ठेवले होते. 2020-21 मध्ये कोरोनाच्या परिस्थितीमुळे शासनाने 18 मार्च 2020 पासून लागू केलेले निर्बंध पुढील आदेश येऊपर्यंत कायम ठेवल्याने रेडीरेकनर दरामध्ये वाढ झाली नव्हती. मात्र, आता एक एप्रिलपासून 10.17 असा वाढीव रेडीरेकनर दर लागू झाला आहे. महापालिका क्षेत्रात मुंबई वगळता, रेडीरेकनर दरात सरासरी 5.95 टक्यांनी वाढ झाली आहे. तर ग्रामीण भागात 3.36 टक्यांनी रेडीरेकनर दर वाढवले आहेत. या नव्या दरांचा थेट परिणाम खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर होईल. यामुळे संबंधित खरेदी-विक्री महागणार आहेत. विशेषतः सोलापूर महापालिका क्षेत्रात, रेडीरेकनर दरातील वाढ सर्वात जास्त आहे.
यापूर्वी नवी पेठ, मेकॅनिक चौक, राजवाडे चौक परिसरात खुली जागा 25 हजार 960, सदनिकेचा 51 हजार 200, कार्यालय 68 हजार 580, दुुकान गाळे एक लाख 40 हजार 850 प्रतिचौरस मीटर दर होता. बाजीराव चौक, लालबहादूर शॉपिंग सेंटर, भागवत टॉकिज, शिंदे चौक परिसरात अनुक्रमे 21 हजारांपासून 56 हजार प्रतिचौरस मीटर, शिवाजी चौक, सुभाष चौक, पारस इस्टेट परिसरात अनुक्रमे 44 हजारांपासून 80 हजार प्रतिचौरस मीटर दर होते. नव्याने वाढविलेल्या रेडीरेकनर दरामुळे स्थावर मालमत्तांचे भाव दुप्पट होण्याची शक्यता आहे.