

मोडनिंब : आठवण ठेवा पांडुरंगा! माझा विसर न व्हावा ! असा देवाचा गजर करत भक्ती रसाने भरलेले अभंग गायनात दंग असलेल्या वारकरी भाविकांनी आपल्या लाडक्या पांडुरंगास अरण गावच्या शिवेपर्यंत चालत जाऊन जड अंत:करणाने भावपूर्ण निरोप दिला.
आषाढ वद्य अमावस्येला आपला लाडका भक्त सावतोबास भेटायला पंढरपूरहून पांडुरंग स्वतः( पालखी) अरणमधे चैतन्य घेऊन आला. गाव सारा माणसांनी फुलून गेला. महाराष्ट्रातून गावोगावातील सावता महाराजांचे वारकरी भक्त संत सावता महाराज समाधी सोहळ्यातील देवभेटीचा विलक्षण आनंदसोहळा पाहण्यासाठी अरणमधे आले होते.शनिवारी या आनंदाला व उत्साहाला श्रीफळहंडीसोहळ्याने उधाण आले. आसमंत विठ्ठल नामाने दुमदुमुन गेला होता.
देवाप्रति भक्ती ओतप्रोत भरली होती. लहान थोर, पावणे रावळे, महिला, शहरातील मंडळी गावी दाखल झाली होती. रविवारी सकाळी वाजत गाजत सावतोबा व विठोबाच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा झाली. जणू सावतोबाच्या भक्तीने फुललेल्या मळ्याला देवाने आपल्या नेत्रात साठविले. आज दुपारी बारा वाजता देव वैकुंठनगरी पंढरपूरकडे जड अंतकरणाने परत फिरले. यात्रा पार पड्याचा आनंद व देव जाणार याचा विरह सर्वांच्या चेहर्यावर दिसत होता. सर्वजण स्तब्ध होते. मनात म्हणत होते, हाची नेम नित्य ठेवा बा विठोबा. काहीजण आतातरी देव पाऊस धाडणार की यंदा दुष्काळ पडणार यावर सगळेजण एकमेकात कुजबुज करीत होते. यावेळी विठुरायाच्या पालखीला निरोप देण्यासाठी माजी सभापती भारत शिंदे, माजी सभापती शिवाजी कांबळे,घनशाम पाटील, विजय शिंदे, विठ्ठल गाजरे व इतर मान्यवर उपस्थित होते.