

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : वाल्मीक कराडच्या मॅनेंजरच्या घरात घुसून मारहाण करणे, त्याच्या अल्पवयीन मुलीला मारहाण करणे, बंदुकीचा धाक दाखवून २ कार आणि सोने नेल्याचा आरोप वाल्मीक याचा मुलगा सुशील कराडवर करण्यात आला होता. दरम्यान, सुशीलवर सोलापुरात गुन्हा दाखल करता येणार नाही, असे सांगत बीड न्यायालयात त्याच्या विरोधात दाद मागावी, असा आदेश सोलापूर न्यायालयाने आज (दि.२१) दिला. त्यामुळे सुशीलला दिलासा मिळाला आहे.
कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, सदरचा गुन्हा सोलापूर न्यायलयीन स्थळ सीमेत येत नाही. तेथील न्यायालयीन घटना जी आहे, ती परळी येथील आहे. तेथील योग्य त्या न्यायालयात जाऊन दाद मागावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
दरम्यान, या घटनेमधील दोन्ही घटना सोलापूरमध्ये घडलेल्या होत्या. त्यामुळे न्यायालयीन स्थळ सीमेचा जो मुद्दा आलेला आहे. त्याविरोधात आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहोत. या प्रकरणामध्ये फोक्सो अंतर्गत 21 प्रमाणे जर का गुन्ह्याबद्दलची माहिती दिली. तर पोलिसांनी 24 तासाच्या आत गुन्हा नोंद करून घ्यायला पाहिजे होता. परंतु, पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद करून घेतलेला नाही.
हा गुन्हा न्यायालयीन स्थळ सीमेत नसल्यामुळे परळी येथील कोर्टात न्यायालयात दाद मागण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याविरोधात आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, अशी माहिती फिर्यादीचे वकील अॅड. विनोद सुर्यवंशी यांनी दिले आहेत.
दरम्यान, मॅनेजरच्या पत्नीने याप्रकरणी सोलापूर पोलीस आयुक्त आणि बीड पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, त्याची दखल घेतली नसल्याचा आरोप केला होता. त्यामुळे पीडित महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात दाद मागितली होती.