

सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थ्यांना वयात एक वर्षाची शिथिलता दिली आहे. त्यामुळे राज्यातील हजारो परीक्षार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
गट ब आणि क परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना एक वर्ष वयाची शिथिलता मिळाली आहे. त्यांना आता सहा जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची संधी उपलब्ध झाली आहे. पूर्वीच्या निकषानुसार वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.
एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 या निश्चित केलेल्या कमाल संवर्गाच्या जाहिरातीस अनुसरून वयोमर्यादेमध्ये एक वर्षाची शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. एक वेळची विशेष बाब म्हणून वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना संधी दिल्यामुळे परीक्षार्थ्यांतून आभार मानले जात आहे.
जिल्ह्यातील 60 उमेदवारांना संधी
राज्यातील हजारो उमेदवार तर सोलापूर जिल्ह्यातील ब व क गटांची परीक्षा देणाऱ्या 60 पेक्षा जास्त भावी अधिकाऱ्यांना परीक्षा देण्याची शेवटची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे सोलापुरातील काही उमेदवार भविष्यात अधिकारी म्हणून शासकीय कामकाजात लागण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यातील मिळणार केंद्रे
दोन्ही परीक्षांसाठी नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना केवळ अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या जिल्हा केंद्रांवरील परीक्षा उपकेंद्रांवर प्रवेश देण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.