

अकलूज : क्रिकेटमध्ये येण्यासाठी कठोर परिश्रम, नियमित सराव, तंदुरुस्ती, चांगले मार्गदर्शन, स्थानिक स्पर्धांमध्ये सहभाग आणि क्रिकेटचे नियम समजून घेणे आवश्यक आहे, असे मत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले.
अकलूज येथील विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुलाच्या प्रांगणात महर्षी जिमखाना व स्पोर्ट्स असोसिएशन यांच्यावतीने भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचा युवकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. त्यानंतर अकलूज नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते दिलीप वेंगसरकर यांचा तर मनाली वेंगसरकर यांचा नगराध्यक्षा रेश्मा अडगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
वेंगसरकर म्हणाले की, सराव आणि कौशल्य, रोज फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा सराव करा. स्टान्स, फूटवर्क, शॉट निवड आणि अचूकतेवर लक्ष केंद्रित करा, क्रिकेट अकादमी जॉइन करा, चांगल्या प्रशिक्षणासाठी आणि शिस्तबद्ध मार्गदर्शनासाठी अकादमी उत्तम आहे. पण तुम्ही स्वतः सराव करूनही शिकू शकता. क्रिकेटसाठी आवश्यक असलेली ताकद, चपळता आणि सहन शक्ती वाढवण्यासाठी व्यायाम करा, शाळा, कॉलेज आणि स्थानिक क्लबच्या स्पर्धांमध्ये खेळा. यामुळे अनुभव मिळतो आणि तुमची कामगिरी निवडकर्त्यांच्या नजरेत येते. क्रिकेटचे नियम आणि कायद्यांची चांगली समज असणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमास राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील, विश्वतेजसिंह मोहिते-पाटील, शिवंशिका मोहिते-पाटील, मुख्याधिकारी सचिन पाटील यांच्यासह नूतन नगरसेवक उपस्थित होते.