

सोलापूर : पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची भारतरत्न पुरस्कारासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करून त्यांचा शासकीय महापुरुषांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी प्रयास संस्थेच्या वतीने राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
कर्मवीर पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण प्रसारासाठी दिले. महाराष्ट्रातील एक प्रेरणादायी शिक्षणमहर्षी म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केल्याने मागास, गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य झाले. कर्मवीर पाटील यांनी कमवा, शिका योजना सुरू करून गरीब व होतकरू मुलांसाठी शिक्षणाची सोय केली. तसेच त्यांनी लोकांना शिक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, अशी अनेक सामाजिक कामे त्यांनी केली आहेत.
महाराष्ट्र घडविण्यासाठी केलेले अमूल्य योगदान विचारात घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी भारत सरकारकडे शिफारस करावी, अशी मागणी प्रयास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.