Raju Shetty: शक्तिपीठ महामार्ग म्हणजे अदानीसाठी घातलेले लोटांगण!

स्वाभिमानीचे राजू शेट्टी कडाडले; वेळापुरात जनआक्रोश मेळावा
Raju Shetty
Raju Shetty
Published on
Updated on

वेळापूर :‌ ‘राज्याला गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग हा केवळ अध्यात्माच्या नावाखाली उद्योगपतींच्या फायद्यासाठी रेटला जात आहे. देवदेवतांच्या नावाचा वापर करून मुख्यमंत्री अदानींसारख्या महादेवासाठी लोटांगण घालत आहेत. या महामार्गामुळे राज्यावर 1 लाख कोटींचा कर्जाचा डोंगर उभा राहणार आह. हा मार्ग हद्दपार केल्याशिवाय राज्यातील जनता शांत बसणार नाही,‌’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खा. राजू शेट्टी यांनी दिला.

वेळापूर (ता. माळशिरस) येथे आयोजित करण्यात आलेल्या शक्तिपीठ विरोधी जनआक्रोश मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ॲड. लक्ष्मण मगर हे होते. तर व्यासपीठावर माळशिरस पंचायत समिती सभापती दत्ता मगर, मच्छिन्द्र ठवरे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष ॲड. लक्ष्मण मगर, स्वभिमानी जिल्हा अध्यक्ष विजय रणदिवे, तालुकाध्यक्ष अजित बोरकर, निमगाव सरपंच सुभाष साठे, माळखांबी उपसरपंच अंकुश सरतापे, रामभाऊ मगर, चेअरमन शहाजी काशीद, तुकाराम राऊत, अमर माने- देशमुख, चांदापुरी भाऊ शिंदे, समाधान मगर-पाटील व शेतकरी उपस्थित होते.

राजू शेट्टी म्हणाले की, हा महामार्ग माढा तालुक्यातील 12, पंढरपूर तालुक्यातील 6 आणि माळशिरस तालुक्यातील 12 गावांतून सातारा जिल्ह्याकडे जाणार आहे. या भागातील शेतकरी द्राक्षे, ऊस, केळी आणि भाजीपाला यांसारखी नगदी पिके घेतात. हा महामार्ग या सुपीक जमिनीतून जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर, सातारा आणि नागपूरला जाण्यासाठी आधीच सक्षम पर्यायी रस्ते उपलब्ध असताना या नवीन मार्गाची गरज काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक के. के. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन रामचंद्र मगर यांनी केले. यासाठी संजय मगर, सचिन मगर, आनंद शेळके, महावीर मगर यांनी परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news