

सोलापूर : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र विठ्ठल राऊत यांनी दणदणीत विजय मिळविला. राऊत यांना पहिल्या पसंतीची ४८३ मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत दौलतराव देशमुख यांना ११८ मते मिळाली. १३ मते बाद ठरली. त्यामुळे राऊत यांनी ३६५ मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.
सोमवारी (दि. २२) सकाळी आठ वाजता जिल्हा नियोजन भवन येथे मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत आघाडीवर होते. अवघ्या एका तासात निकाल लागला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरसेवक, सदस्य आणि लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात भाजपच्या बाजूने मतदान केल्याचे निकालातून स्पष्ट झाले.
दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वसंत देशमुख यांना अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगितलेल्या अदृश्य शक्तीने देशमुख यांना नाकारल्याचे निकालातून स्पष्ट झाले. निकाल लागताच नियोजन भवन आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राऊत समर्थकांसह भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण केली. बॅन्जो, हलगीच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरला. तर देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी निकाल ऐकताच तेथून काढता पाय घेतला.
वसंत देशमुख यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक बिनविरोध करण्याचे भाजपचे मनसुबे उधळले होते. खा. मोहिते-पाटील यांनी अदृश्य शक्ती आमच्या पाठीशी असून विजय आमचाच होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे भाजपने ही निवडणूक हलक्यात न घेता संपूर्ण ताकदीने प्रचार करीत रणनीती आखली. निकालानंतर राष्ट्रवादीची अदृश्य शक्ती गायब झाल्याचे दिसून आले. या निकालामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे जिल्ह्यातील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले.