

सोलापूर : यंदा पाऊस थांबायचे नाव घेत नाही. मे महिन्यात विक्रमी पाऊस झाल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा गुरुवारी (दि. 5) दुपारी जोरदार हजेरी लावली. पावसाच्या पुनरागमनामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी शेतीतील पेरणीची कामे रखडली आहेत.
30 मे नंतर पावसाने दडी मारली होती. बुधवारी (दि. 4) रात्रीपासून पुन्हा सोलापूर शहरासह ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली. रात्रभर पाऊस पडला. गुरुवारी साडेबारा वाजेपर्यंत शहर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे उंचसखल भागात पाणी साचले होते. कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. बुधवारी रात्री ते गुरुवारी सकाळी साडे आठ वाजेपर्यंत 10.3 मिमी तर गुरुवारी सायंकाळपर्यंत 1.4 मिमी पाऊस पडल्याची हवामान खात्याकडे नोंद झाली आहे. कमाल तापमान 29.6 अंश सेल्सिअस इतकी नोंदली आहे.
येत्या 8 जून रोजी मृग नक्षत्राच्या पावसाला प्रारंभ होत आहे. त्याआधीच रोहिणी नक्षत्रातील पावसाने दमदार बॅटिंग सुरू केली आहे. सोलापूर शहरातील बसस्थानक, रेल्वे स्थानक, सात रस्ता, विजापूर रोड, अक्कलकोट परिसरात उंचसखल भागात पाणी साचले होते. पावसाच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहने चालविताना कसरत करावी लागली.