

तुळजापूर : तुळजापुरात गेल्या तीन महिन्यांपासून ४० अंशांवर गेलेला पारा आज गुरुवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह झालेल्या हलक्या पावसाने डाऊन झाला. उकाड्याने हैराण झालेल्या त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला.
पाऊस आला की वीज पुरवठा गुल हे नित्याचेच झाले आहे. तुळजापुरात देवीदर्शनाच्या निमित्ताने दररोज लाखों भाविकांची वर्दळ पहावयास मिळते; मात्र वीज महावितरणचा कारभार अद्याप सुधारलेला नाही.शहरात सर्वदूर रस्त्याच्या कडेला असलेल्या पोलवरील वीजप्रवाह वाहणाऱ्या लोंबकळणाऱ्या तारा, उघडे ट्रान्सफॉर्मर, मध्येच या तारांमध्ये झाडांचे फाटे शिवाय उघड्या डीपीमध्ये कुणीही फेरफार करणारे महाभाग यावर कुणाचाही अंकुश अथवा वाचक राहिलेला नाही.
तुळजापूर शहरात व्हीआयपी झोन म्हणून आर्य चौकाच्या पुढील अर्धा भाग सुरळीत चालू असतो. मात्र अर्ध्या भागात वारंवार वीज खंडित होते. मंकावती गल्ली, कवठेकर गल्ली,साळुंके गल्ली, किसान चौक, भोसले गल्ली,हुडको वसाहत, कणे गल्ली, भीमनगर, मातंगनगर अशा विविध भागात वीज गुल झाली की कुणीही ढुंकूनही लक्ष देत नाहीत. ग्राहकांनी तक्रार अथवा फोन केला तर तो उचलायची तसदीही कर्मचारी घेत नाहीत. शहरात अनेक भागात निजामकालीन पोललाईन अस्तित्वात आहे. ती बदलण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अनेकवेळा दुर्लक्षित भागात शॉक लागून जनावरेही दगावली आहेत.