

सोलापूर : या पुढील काळात रेल्वेच्या प्रवाशांना प्रवास करताना सामानाबाबत काळजी घ्यावी लागणार आहे. विमानाप्रमाणेच रेल्वे प्रशासनही प्रवाशांच्या सामानांची तपासणी करण्यासाठी नवीन यंत्र प्रणाली लागू करणार आहे. स्टेशनवर रेल्वेत चढण्याआधी प्रत्येक प्रवाशाच्या सामानाचे वजन केले जाईल. जर त्याचे मर्यादेपेक्षा जास्त वजन असेल, तर अतिरिक्त सहापट शुल्क भरावे लागणार आहे. शुल्क नाही भरल्यास संबंधित प्रवाशावर सहापट दंड आकारला जाणार आहे.
रेल्वे स्टेशनवर वजन तपासणारी यंत्रणा बसवण्यात येणार आहे. प्रवाशांना रेल्वेत प्रवास करण्यापूर्वी आपल्या सामानाचे वजन करणे बंधनकारक राहील. मर्यादेपेक्षा जास्त वजन असल्यास प्रवाशांना अतिरिक्त जादा शुल्क आकारले जाणार आहे. अधिकार्यांच्या मते काही प्रवासी जास्त लगेज घेऊन प्रवास करत असल्याने अन्य प्रवाशांना त्याचा त्रास होतो. शिवाय, सुरक्षेची समस्या निर्माण होते. म्हणून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व सोयीसाठी हा नियम लागू केला आहे. हा नियम कायदेशीर ठरवला जाणार आहे.
वजन यंत्रे बसविणार
चालू आर्थिक वर्षात ही प्रणाली सुरू होणार आहे. याअंतर्गत कानपूर सेंट्रल, मिर्झापूर, अलिगड, प्रयागराज, जंक्शन, टुंडला यासह विभागातील प्रमुख स्थानकांवरील प्रवेश व निर्गमन गेटवर इलेक्ट्रॉनिक वजन यंत्रे बसवली जात आहेत. नंतर ती टप्प्याटप्प्याने देशभरात बसवली जातील.