Solapur Spa Center Raid | सोलापुरात स्पा सेंटरवर छापा; चार पीडित महिलांची सुटका
सोलापूर : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणार्या विजापूर रोडवरील माया फॅमिली ‘स्पा’वर पोलिस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकला. चार पीडित महिलांची सुटका केली. स्पा चालकास अटक करण्यात आली. स्पा चालकाने पोलिस येऊ नयेत यासाठी इमारतीची लिफ्ट बंद केली, लोखंडी गेटला कुलूप लावले; परंतु पोलिसांनी शेजारील इमारतीमधील लोखंडी शिडी घेऊन पहिल्या मजल्यावर प्रवेश केला.
पोलिस हवालदार अकिला युसूफ नदाफ यांच्या फिर्यादीवरून चालक विशाल धोत्रे (वय 32 , रा. झोपडपट्टी नंबर 1, जुना विजापूर नाका, सोलापूर) व माया स्पाचे मालक संदेश साळवे (रा. ठाणे) यांच्या विरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अटक केलेल्या चालक धोत्रे यास न्यायालयाने 27 मे पर्यंत पोलीस कोठडी दिली.
विजापूर रोडवरील अत्तार नगर कॉम्प्लेक्स येथे दुसर्या मजल्यावर स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली. सदरची कामगिरी प्रभारी पोलीस आयुक्त अजित बोर्हाडे, पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली काळे, सहा. पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील पोलीस निरीक्षक महादेव राऊत, सहाय्यक फौजदार हेमंत मंठाळकर, महादेव बंडगर, अकिला नदाफ, सुशिला नागरगोजे, नफिसा मुजावर, सुजाता जाधव, सीमा खोगरे, उषा मळगे, चिकमळ, शैलेश बुगड, दादा गोरे यांनी पार पाडली.
स्पा चालकाने लिफ्ट केली बंद
शुक्रवारी पोलिस अधिकारी व अंमलदार या ठिकाणी छापा टाकण्याकरिता गेले. त्यावेळी आरोपीने पोलिस बिल्डिंगमध्ये येऊ नये म्हणून लिफ्ट बंद केली आणि जिन्याचे लोखंडी गेट कुलूप लावून बंद केले. शेजारी इमारतीमध्ये असलेल्या लोखंडी शिडीच्या सहाय्याने पहिल्या मजल्यावर प्रवेश करून छापा टाकला. त्या ठिकाणी चार पीडित महिला मिळून आल्या. चालक धोत्रे याला अटक करण्यात आली. स्पा मालक संदेश साळवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

