

उत्तर सोलापूर : दरवर्षी महावितरणला 25 कोटी रुपये भरण्यापेक्षा महामंडळाच्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्प राबवून या पाण्याचा उपसा करू. त्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी केले.
कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन प्रकल्प योजना क्रमांक दोन अंतर्गत गावडी दारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथे उभारण्यात येणार्या पंपगृहाचे पूजन व उद्घाटन विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. त्यांनी पंपगृहाच्या कामाची सखोल माहिती घेऊन पाहणी केली. या प्रसंगी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) चे उपाध्यक्ष तथा आमदार राणा जगजीतसिंह पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, भाजपचे उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष संभाजी दडे, गावडी दारफळचे सरपंच भारत माळी, दत्ताभाऊ कुलकर्णी, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता थोरात, कार्यकारी अभियंता अमोल नाईक, देविदास पवार, केशव माने, विशाल पवार उपस्थित होते.
मंत्री विखे-पाटील यांनी प्रथम सिंचन प्रकल्पाच्या कामांची सविस्तर पाहणी केली. कृष्णा मराठवाडा योजनेतील टप्पा क्रमांक दोन अंतर्गत गावडी दारफळ येथे उभारण्यात येणार्या पंपगृहाचे पूजन केले. प्रकल्पाच्या कार्यपद्धती, प्रगती आणि भविष्यातील लाभधारक क्षेत्राचा आढावा घेण्यात आला. या प्रकल्पामुळे सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील शेतकर्यांना स्थिर व भरपूर पाणी मिळणार असून, शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.
शेतकर्यांच्या शेतमालाची अडचण होऊ नये
कालव्याच्या मार्गावर काही ठिकाणी पुलाची कामे केलेली आहेत. त्या ठिकाणी रस्त्याचे कामही चांगल्या पद्धतीने करण्यात यावे. जेणेकरून शेतकर्यांना त्यांच्या मालाची वाहतूक करताना कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नये, अशा सूचनाही जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी अधिकार्यांना दिल्या.