

टेंभुर्णी: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वेनेगावजवळ रविवारी (दि.४ जानेवारी) पहाटे एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका पुरुषासह दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. हे तिन्ही मयत नंदुरबार जिल्ह्यातील असून ऊसतोड कामगार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास हे तिघेही (एमएच ३९ ई ६७७८) या क्रमांकाच्या दुचाकीवरून सोलापूरच्या दिशेने जात होते. वेनेगाव (ता. माढा) परिसरात आले असता, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, दुचाकीवरील तिघांचाही जागीच अंत झाला. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये खारकी भील (वय २६ वर्षे), मीरा भील (वय ३८ वर्षे), पायल भील (वय १५ वर्षे) सर्व शहादा तालुक्यातील कोटबंधनी (पो. रायपूर) येथील रहिवासी आहेत. हे कर्मचारी पंढरपूर तालुक्यात ऊसतोडणीचे काम करत होते. मात्र, भल्या पहाटे ते नेमके कोठे निघाले होते, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझाचे गस्ती पथक, डॉ. प्रशांत कारंजकर, रुग्णवाहिका चालक बंडू गायकवाड आणि अकबरभाई खान यांच्या मदतीने मृतांना टेंभुर्णी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले. मोडनिंब महामार्ग पोलीस केंद्राचे पीएसआय किरण अवताडे, विजय साळुंखे आणि टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. मृतांच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती देण्यात आली असून, टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अज्ञात वाहनधारकाचा शोध पोलीस घेत आहेत.