

सोलापूर : दुबंई पर्यटनाच्या ट्रिपचे पॅकेज देऊन सोलापुरातील ट्रॅव्हल एजंटने पुण्यातील एका महिलेसह तिच्या कुटुंबांची तब्बल दोन लाख पाच हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पूजा धनराज डोईफोडे (वय ४१, रा. काळेपडळ, हडपसर, पुणे) यांनी पुणे येथील वानवडी येथील काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार सोलापुरातील ‘छत्रपती पर्यटन टूर्स अँड ट्रॅव्हल्स’चे चालक शिवाजी तानाजी पवार (रा. द स्क्वेअर मॉल, मुरारजी पेठ, सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी पूजा डोईफोडे यांनी संशयीत आरोपी शिवाजी पवार याच्या दुबई ट्रिपच्या पॅकेजची जाहिरात पाहून स्वतःसह चौघांसाठी दुबई ट्रीपचे बुकिंग केले. त्यासाठी एकूण चार लाख १५ हजार रुपये ऑनलाईन जमा केले. २८ फेब्रुवारी रोजी दुबईसाठी ट्रिप जाणार होती परंतु आदल्या दिवशी म्हणजे २७ फेब्रुवारी रोजी संशयीत आरोपी शिवाजी पवार याने फोन करून ट्रिपमधील सदस्याचे निधन झाल्यामुळे ट्रिप कॅन्सल झाल्याचे सांगितले.
त्यानंतर विविध कारणे सांगत ट्रिप रद्द केल्याचे सांगितले. त्याला पूजा डोईफोडे यांनी पैसे परत मागितले परंतु विविध कारणे सांगून पैसे परत करण्यास त्याने टाळाटाळ केली. त्यानंतर आरोपी शिवाजी पवार याने पूजा डोईफोडे त्यांची आई व मावशी यांच्या अकाउंटवर तुकड्या-तुकड्याने एकूण २ लाख १० हजार रुपये ऑनलाईन परत केले. उर्वरित २ लाख ५ हजार रुपये देण्यास तो टाळाटाळ करू लागला. त्यानंतर त्याने दिलेला १ लाख ७५ हजारांचा धनादेश दिला परंतु बँकेत चेक भरल्यानंतर तो ‘बाऊन्स’ झाला. दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात येताचा पूजा डोईफोडे यांनी वानवडी येथील काळेपडळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली त्यानुसार शिवाजी पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.