

पोखरापूर : भटके विमुक्त समाजातील डोंबारी, पारधी, मर्गीवालेे, डवरी, बहुरूपी, गोसावी आदी कुटुंबातील रेशनकार्डधारकांना पंतप्रधान राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचे मोफत धान्य मिळावे, विविध दाखले तत्काळ मिळावेत, स्मशानभूमीला जागा उपलब्ध करुन द्यावी, भूमिहिनांना घरकूल, दिवाबत्ती, रस्ते, पिण्याचे पाणी आदी मुलभूत सोयी-सुविधा मिळाव्यात, या व इतर मागण्यांसाठी भारतीय दलित महासंघ भटके विमुक्त आघाडीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संजीव खिलारे यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तहसील कार्यालयासमोर बेमुदत राहुटी आंदोलन करण्यात आले.
मोहोळ तालुक्यातील कोळेगाव, यावली, टाकळी सिकंदर, पेनुर, मोहोळ शहर, पाटकूल व इतर ठिकाणी पालावर राहणार्या डोंबारी, पारधी, मर्गीवाले, डवरी व इतर भटक्या व वंचित घटकातील नागरिकांना राहायला घर, जागा नाही, रेशनकार्ड नाही, त्यामुळे इतर शासकीय सुविधा मिळत नाहीत. पंतप्रधान राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे धान्य मिळत नसल्यामुळे त्यांची उपासमार सुरू आहे. एकीकडे शासन सर्व शिक्षा अभियानासाठी हजारो कोटी खर्च करत असताना या भटक्या व वंचित घटकातील मुलांना शिक्षणाच्या सुविधा मिळत नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय जागेत राहणार्या या भटक्या समाजातील जमातीची अतिक्रमणित घरे नियमित केली नाहीत. त्यांना पिण्यासाठी पाणी नाही आणि शेवटचा अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीला जागाही मिळत नाही. शासन यंत्रणा अशा भटक्या समाजातील कुटुंबांच्या मूलभूत प्रश्नासाठी उदासीन असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय दलित महासंघाच्या वतीने मोहोळ तहसील कार्यालयासमोर सोमवारी आगळ्यावेगळ्या पद्धतीने राहुटी आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात भटक्या व वंचित घटकातील नागरिकांनी कुटुंबासमवेत सहभाग घेऊन त्याठिकाणी चुली पेटवून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी भारतीय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजीव खिलारे, भारतीय दलित महासंघ भटक्या विमुक्त आघाडीचे मोहोळ तालुकाध्यक्ष उत्तम पवार, तालुका कार्याध्यक्ष प्रकाश पवार, दिलीप पवार, भाऊसाहेब जाधव, दत्तू शिंदे, सुनील पवार, भाऊराव शिंदे, भाऊसाहेब पवार, रावसाहेब शिंदे, रवी जाधव, संजय शिंदे, शिवाजी इपोळे, दत्तात्रय सूर्यवंशी, सचिन चव्हाण, ईश्वर चव्हाण यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डोंबारी समाजातील लहान मुले, महिला यांनी पारंपरिक खेळ करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.