

OBC Certificate Investigation
सोलापूर : महापालिकेचे आयुक्त तथा धाराशिवचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राची चौकशी करण्याचे पत्र केंद्र शासनाने राज्य शासनास दिले आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी तातडीने या प्रकरणाची तपासणी करून अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे या प्रमाणपत्राची पडताळणी केली जात आहे. तर तक्रार खोटी असल्याचा दावा महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बसे यांनी केला आहे.
बनावट प्रमाणपत्राच्या आधारे केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्याचे पूजा खेडकर यांचे प्रकरण ताजे असतानाच डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राची तसेच नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. डॉ. ओम्बासे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बाळासाहेब सुभेदार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयाकडे डॉ. ओम्बासे यांच्या विरोधात प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार केली आहे. त्यानुसार केंद्रीय सचिव अंशुमन मिश्रा यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
आपल्या विरोधात केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे केलेल्या तक्रारीत कोणतेही तथ्य नाही. परंतु शासनाकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून सत्याची बाजू समोर येईल. चौकशीसाठी बोलाविल्यास बाजू मांडू. कागदपत्र सादर केली आहेत.
-डॉ. सचिन ओम्बासे, आयुक्त, महापालिका