

मंगळवेढा : गेली अनेक वर्षे रखडलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे काम तत्काळ सुरू करावे. या मागणीसह अन्य मंगळवेढ्यातील अन्य प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या मागणीचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांचे निवेदन खा. प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रालयात भेटून दिले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे निधीची उपलब्धता करून तत्काळ सुरू करण्यात यावे. लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्यावी. संततधार पावसामुळे तालुक्यातील शेतकर्यांच्या खरीप पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत. नुकसान भरपाई निश्चितीसाठी 65 मिलिमीटर पावसाची अट शिथिल करण्यात यावी.
मंगळवेढ्यातील महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा. उपेक्षित संत चोखोबा स्मारकास मंजुरी मिळावी. सहा वर्षांपूर्वीच्या छावणी चालकाची थकीत देयके अदा करण्यात यावीत. म्हैसाळचे पाणी सोडण्यासाठी म्हैसाळ वितरिकेपासून थेट तलावात पाईपलाईनच्या कामास मंजुरी मिळावी, या मागण्यांचा यामध्ये समावेश होता.
यावेळी आ. अभिजित पाटील, प्रदेश सचिव अॅड. रविकिरण कोळेकर, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सातलिंग शटगार, सोलापूर काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, किरणराज घाडगे, मंगळवेढा तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, अशोक चेळेकर उपस्थित होते.