

Praniti Shinde Sushilkumar Shinde on Delimitation Bill
सोलापूर : डीलिमिटेशन विधेयकावरून काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. राष्ट्रवादीने या विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान केल्यास ती केवळ काँग्रेस किंवा इंडिया आघाडीशी केलेली गद्दारी ठरणार नाही, तर देशाशी केलेली गद्दारी असेल, असा घणाघात त्यांनी केला. राष्ट्रवादीला या विधेयकाचे समर्थन करण्याची एवढी मजबुरी का आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
शरद पवार यांना राज्यसभेची जागा देण्यासह विविध राजकीय प्रसंगांत काँग्रेसने नेहमीच साथ दिली. मात्र आता डीलिमिटेशनसारख्या देशाच्या हिताच्या प्रश्नावर राष्ट्रवादीची भूमिका बदलत असेल, तर ही देशाशी केलेली गद्दारी ठरेल. पुरोगामी विचार, शाहू-फुले यांची विचारधारा आणि संविधानावर विश्वास ठेवून जनतेने राष्ट्रवादीला निवडून दिले आहे. मात्र पक्षाची सध्याची भूमिका याच विचारांच्या विरोधात जाणारी असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केली.
महिला आरक्षणासाठी खासदारांची संख्या वाढवण्याची गरज काय, असा सवाल करत ५४३ जागांमध्येच ३३ टक्के आरक्षण लागू करण्याची काँग्रेसची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपला महिलांना आरक्षण द्यायचे नसून स्वतःचे राजकीय वर्चस्व कायम ठेवायचे आहे. मतदारसंघांची पुनर्रचना करण्याची ब्लू प्रिंट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे असावी, असा आरोपही त्यांनी केला. या विधेयकाच्या विरोधात इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मतदान करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीच्या काही खासदारांशी आपले बोलणे झाले असून त्यांच्या भूमिकेत संभ्रम दिसत असल्याचे प्रणिती शिंदे यांनी सांगितले. पक्षाच्या भूमिकेविरोधात जाण्याची हिंमत खासदारांनी दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले. जितेंद्र आव्हाड यांची भाषणे संविधानाला धरून असतात. मात्र तेही दबावाखाली भूमिका बदलत असतील, तर त्यांच्या मतदारांसाठी ही शोकांतिका असल्याचे त्या म्हणाल्या.
महाराष्ट्रातील खासदार फोडण्यासाठी ५० कोटी रुपये, तर अन्य ठिकाणी १५० कोटी रुपयांची ऑफर असल्याची चर्चा आपण समाजमाध्यमांवर ऐकल्याचे शिंदे म्हणाल्या. भाजपकडून अशा प्रकारची कटकारस्थाने केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
रोहित पवार यांच्या समाजमाध्यमांवरील पोस्टमागे त्यांचे वैयक्तिक राजकारण असू शकते. ते कुटुंबातील आहेत, त्यामुळे त्यांच्या पोस्टवर मला भाष्य करायचे नाही. रोहित पवार यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबतही मला कोणतीही माहिती नाही. त्याबाबत त्यांनाच विचारावे, अशी प्रतिक्रिया प्रणिती शिंदे यांनी दिली
मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी विरोधाची भूमिका घेतली असताना, त्यांचे वडील आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मात्र याबाबत वेगळी भूमिका मांडली आहे. डिलिमिटेशन होणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठीची योग्य वेळ निघून गेली आहे. ही प्रक्रिया सर्वसंमतीने झाली असती तर अधिक चांगले झाले असते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
शिंदे म्हणाले, 'राष्ट्रवादीची काय इच्छा आहे, यावर मी काय बोलणार? त्यांचा पक्ष वेगळा आहे आणि आमचा पक्ष वेगळा आहे. प्रत्येकाचा विचार वेगळा असू शकतो.' 'डिलिमिटेशन व्हायला पाहिजे, ते होणे गरजेचे आहे. मात्र, त्यासाठीचा काळ आता निघून गेला आहे. सध्याची परिस्थिती पाहता, ही प्रक्रिया सर्वांच्या सहमतीने झाली असती तर चांगले झाले असते.' मात्र, अशा प्रकारे विभागणी झाली तर त्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि देशाच्या दृष्टीने धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.